Guru Gochar 2026 : ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी गुरू ग्रह राशी बदलणार आहे. ३१ ऑक्टोबरला गुरू कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करील. ज्योतिषात गुरू ग्रहाचा संबंध ज्ञान, पैसा, विवाह, संतान, शिक्षण आणि प्रगतीशी जोडला जातो. त्यामुळे गुरूचा हा राशिबदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीवर वेगवेगळा असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, मेष, कर्क, सिंह व वृश्चिक या राशींच्या लोकांना कामापासून ते पैशांपर्यंत आणि वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक महत्त्वाचे बदल घडून येऊ शकतात.

मेष

गुरूचा हा राशिबदल मेष राशीच्या लोकांसाठी कामकाजाशी संबंधित असू शकतो. नोकरीत ज्या बदलाची तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होतात, तो आता पुढे सरकू शकतो. ऑफिसमध्ये एखाद्या मोठ्या कामाची नवीन जबाबदारी मिळू शकते. आतापर्यंत ज्या लोकांना त्यांच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळत नव्हते, त्यांना आता आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांसाठी नवे संपर्क तयार होतील. एखादे जुने काम पुन्हा सुरू होऊ शकते. व्यवसाय वाढविण्याचा विचार करीत असाल, तर नवीन पर्याय समोर येतील. पैशांच्या बाबतीतही आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात.

कर्क

गुरूचे राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी खास ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणजेच ओळख मिळू शकते. एखाद्या जुन्या कामाचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. ऑफिसमध्ये जबाबदारी वाढण्यासोबतच तुमची भूमिकाही बदलू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. बचतीबाबत नवीन योजना आखता येईल. व्यापाऱ्यांना जुन्या संपर्कांपासून फायदा होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण होईल. गुरू सिंह राशीत गेल्यानंतर भविष्यात कमाई आणि बचतीवर जास्त भर राहील.

सिंह

३१ ऑक्टोबरचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी खूप खास असेल. ज्या कामांबद्दल बऱ्याच काळापासून द्विधा मनःस्थिती होती, तेथे परिस्थिती स्पष्ट होईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिक आपल्या कामाचा विस्तार करण्याची योजना आखू शकतात. नवीन काम सुरू करण्याची किंवा जुने काम नवीन पद्धतीने पुढे नेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरेल. त्यांचे अभ्यासात लक्ष लागेल आणि उच्च शिक्षणासाठी त्यांना नवीन पर्याय मिळतील. लोकांमध्ये तुमच्या शब्दाला महत्त्व प्राप्त होईल; मात्र कोणताही निर्णय घाईगडबडीत घेणे टाळा.

वृश्चिक

गुरूचे हे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी‌ भाग्याशी जोडलेल्या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल आणू शकते. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. बऱ्याच दिवसांपासून ज्या संधीची वाट पाहत होतात, ती समोर येऊ शकते. व्यावसायिकांना दूरच्या ठिकाणांशी संबंधित काम मिळू शकते. परदेशातील किंवा दुसऱ्या शहरातील लोकांसोबत काम करण्याची संधी निर्माण होईल. प्रवासाचे योग आहेत. यादरम्यान झालेले नवे संपर्क भविष्यात उपयोगी पडतील. विद्यार्थी उच्च शिक्षणाबाबत निर्णय घेऊ शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या रणनीतीत बदल करण्याची संधी मिळेल. धार्मिक व आध्यात्मिक कामांमध्ये आवड वाढेल. कुटुंबासह धार्मिक यात्रेचे नियोजन होऊ शकते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)