Guru Nakshatra Change 2026 Positive Impact on These Zodiac Signs: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरू बृहस्पती यांच्या नक्षत्रातील हालचालीला विशेष महत्त्व दिले जाते. ३ सप्टेंबर २०२६ रोजी गुरू अश्लेषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार असून, २० सप्टेंबरपर्यंत तो याच चरणात राहील. या बदलामुळे सर्वच राशींच्या लोकांवर वेगवेगळा परिणाम जाणवू शकतो. मात्र, ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार मकर, तूळ व सिंह या राशींच्या लोकांसाठी हा काळ काही सकारात्मक शक्यता घेऊन येऊ शकतो.
आश्लेषा नक्षत्राचा स्वामी बुध असून, गुरू ग्रह ज्ञान, विस्तार, भाग्य आणि प्रगतीशी संबंधित मानला जातो. त्यामुळे या नक्षत्रातील त्याच्या हालचालीमुळे काही व्यक्तींच्या आयुष्यात रखडलेली कामे पुढे सरकण्याची, आर्थिक संधी मिळण्याची किंवा करिअरमध्ये नवे मार्ग खुले होण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात व्यक्त केली जाते.
मकर
या काळात कामातील बारकावे समजून घेण्याची क्षमता वाढू शकते. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत बराच काळ संभ्रम असेल, तर योग्य दिशा सापडण्याची शक्यता आहे. स्वतःमधील एखादी लपलेली कला किंवा कौशल्य इतरांसमोर येऊ शकते आणि त्यातून करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
विवाहाशी संबंधित एखादे रखडलेले काम पुढे सरकू शकते. वैवाहिक जीवनातील गैरसमज कमी होऊन संवाद सुधारण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी, पगारवाढ किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी चर्चेत असलेला एखादा करार प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. योग्य बोलणी आणि संयमामुळे आर्थिक लाभाचे मार्ग खुले होऊ शकतात. समाजात मान-सन्मान वाढण्याचीही शक्यता आहे.
तूळ
करिअरच्या दृष्टीने हा काळ काही महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येऊ शकतो. आतापर्यंत केलेल्या मेहनतीकडे वरिष्ठांचे लक्ष जाऊ शकते. एखादे रखडलेले काम अचानक पुढे सरकून, त्यातून नवीन जबाबदारी मिळू शकते. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रीय गणनेत व्यक्त केली जाते.
व्यवसाय विस्तारण्याचा विचार अनेक दिवसांपासून सुरू असेल, तर त्याला प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते. नवीन ग्राहक, नवीन काम किंवा उत्पन्नाचा अतिरिक्त मार्ग मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी-विक्रीशी संबंधित व्यवहारातून फायदा होऊ शकतो. कुटुंबातील जुना वाद संवादातून मिटण्याची शक्यता असून, एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात वाणीचा प्रभाव उपयोगी ठरू शकतो.
सिंह
या काळात परदेशाशी संबंधित कामांकडे विशेष लक्ष वेधले जाऊ शकते. परदेशात नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. परदेशातून आर्थिक लाभ मिळण्याची किंवा परदेशाशी संबंधित एखादे काम अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रकारे पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते.
मालमत्ता किंवा आयात-निर्यातीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठीही काही सकारात्मक संधी निर्माण होऊ शकतात. जुन्या ओळखी पुन्हा उपयोगी ठरून एखादा महत्त्वाचा व्यवहार पुढे सरकू शकतो. बराच काळ अडकलेली शासकीय कागदपत्रे किंवा कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असून, पैतृक मालमत्तेशी संबंधित वादात तोडगा निघण्याचे संकेतही काही ज्योतिषीय गणनांमध्ये दिले जातात.
एकंदरीत, ३ सप्टेंबरला होणारा गुरूचा नक्षत्रचरण बदल मकर, तूळ व सिंह या राशींच्या लोकांसाठी लक्षवेधी ठरू शकतो. करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि रखडलेल्या कामांमध्ये हालचाल होण्याची शक्यता असली तरी प्रत्यक्ष परिणाम व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहस्थितीवर अवलंबून असतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
