Holika Dahan Muhurat 2026: २०२६ या वर्षामध्ये होळीचा सण अगदी खास आणि दुर्मीळ संयोगाने साजरा होणार आहे. कारण- या वर्षी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे आणि या संयोगामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. सुतक काळात होलिका दहन आणि रंगांची होळी कशी साजरी केली जाईल? ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, हा संयोग १०० वर्षांनंतर होतो आहे, ज्यामुळे होळीच्या सणावर चंद्रग्रहणाचा प्रभाव असणार आहे आणि त्याचे नियम विशेष महत्त्वाचे ठरतात.

होलिका दहन हा फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी केला जातो. हे ‘वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.’ परंतु, ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणापूर्वी नऊ तासांचा सुतक काळ लागू होतो. सुतक काळात पूजा, धार्मिक कार्य किंवा होलिका दहनाचे विधी करणे टाळले जाते. मंदिरांची कपाटे बंद केली जातात आणि धार्मिक विधी थांबविण्याचा नियम लागू होतो. त्यामुळे या वर्षी होलिका दहन आणि होळी पूजनासाठी योग्य अशी वेळ ठरवणे हा खूपच संवेदनशील विषय ठरला आहे.

हिंदू परंपरेत मंदिरांची कपाटे बंद होणे म्हणजे ग्रहण, सुतक किंवा रात्रीच्या वेळी देवाची मूर्ती आणि मंदिराचे मुख्य दरवाजे दर्शनासाठी तात्पुरते बंद केले जाणे. ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आणि भक्तांच्या आरोग्यासाठी (अल्ट्राव्हायोलेट किरण) कपाटे बंद ठेवली जातात, जी ग्रहण सुटल्यावर शुद्धीकरणाद्वारे उघडली जातात.

२०२६ या वर्षामध्ये चंद्रग्रहण ३ मार्च रोजी दुपारी ३:२० वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ६:४७ पर्यंत ते राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणापूर्वी सकाळी ६:२० पासून सुतक काळ सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत त्याचा प्रभाव राहील. ग्रहणाच्या वेळेत भारतातील दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सुमारे ३०-३५ मिनिटे ग्रहण दृश्य असेल. या परिस्थितीत मंदिरांची कपाटे बंद राहतील आणि पूजापाठ करणाऱ्यांवर दोष लागू होण्याची शक्यता असते, असे मानले जाते.

होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काही पंचांगांनुसार ३ मार्च सकाळी ६:४८ ते ८:५० पर्यंत आहे; तर काही पंचांगांनुसार २ मार्चच्या पौर्णिमेच्या प्रदोष काळात होलिका दहन करण्याचे निर्देश आहेत. मात्र, २ मार्चच्या रात्री भद्राचा प्रभाव राहील. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, भद्र आणि सुतक यांचा विचार करूनच होलिका दहन आणि होळी पूजन केले पाहिजे.

यंदा, २ मार्चला भद्राची पडछाया असल्याने, होलिका दहन आणि होळी पूजन करण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, भद्रविहीन काळातच होलिका दहन करणे उत्तम ठरेल. म्हणजेच होलिका दहन भद्र आणि सुतक काळाच्या प्रभावाशिवाय करणे सुरक्षित राहील. तसेच, होळी पूजन महिलांनी एक दिवस आधी म्हणजे २ मार्च रोजी करावे. कारण- ३ मार्च रोजी सकाळी ६:२० वाजता चंद्रग्रहणाचा सुतक काळ सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत तो चालू राहील.

म्हणून या वर्षी होळीचा सण, होलिका दहन व धूलिवंदन या सर्व गोष्टी ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने योग्य त्या वेळेवर साजऱ्या केल्या जातील, असे दिसते. ग्रहण आणि भद्राचा प्रभाव यांमुळे काही बदल होऊ शकतात. त्यामुळे लोकांना सणाचा अनुभव सुरक्षित आणि पारंपरिक रीतीने घेता येईल, असे ज्योतिषशास्त्रज्ञांचे मत आहे.

सारांश असा की, १०० वर्षांनंतर होणाऱ्या या अनोख्या संयोगामुळे सण अधिक रोमहर्षक आणि उत्सुकतेने भरलेला दिसणार आहे. सुतक आणि भद्राचा विचार करून योग्य त्या वेळा ठरवल्या गेल्या आहेत. त्यामुळे भक्तगण निश्चिंत राहून होलिका दहन आणि रंगांची होळी साजरी करू शकतील, असा ज्योतिषशास्त्रज्ञांचा संभाव्य दृष्टिकोन आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)