Today Horoscope 4 June: समसप्तक योग ४ जूनच्या सकाळी चंद्राने मकर राशीत प्रवेश करताच तयार झाला आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून सातव्या भावात असतात, तेव्हा समसप्तक योग तयार होतो.

सध्या गुरु कर्क राशीत आहेत, म्हणजेच मकर राशीत असलेल्या चंद्रापासून सातव्या भावात आहेत. तसेच चंद्रही गुरूपासून सातव्या भावात स्थित आहे. अशा स्थितीत दोन शुभ ग्रहांमध्ये तयार झालेला समसप्तक योग काही राशींच्या जीवनात आर्थिक सुधारणा घडवून आणू शकतो. या राशींसाठी ४ जून ते ७ जून हा काळ खूप खास ठरणार आहे. जाणून घेऊया या राशींबद्दल.

मेष राशी (Aries Horoscope)

समसप्तक योगाच्या काळात गुरु तुमच्या सुखभावात असतील आणि चंद्र कर्मभावात असेल. त्यामुळे हा योग तयार झाल्यानंतर तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. या राशीतील काही लोकांच्या उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे शेवटचे काही दिवस तुमच्यासाठी संस्मरणीय ठरू शकतात.

कर्क राशी (Cancer Horoscope)

गुरु आणि चंद्र अनुक्रमे तुमच्या प्रथम आणि सप्तम भावात आहेत. त्यामुळे समसप्तक योगामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या सकारात्मक बदल जाणवू शकतात. काही कारणामुळे तणावात असाल, तर ४ ते ७ जूनदरम्यान तुम्हाला दिलासा मिळू शकतो. या राशीतील लोकांना केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. व्यावसायिकांना मोठी डील मिळाल्यामुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळू शकते.

कन्या राशी (Virgo Horoscope)

तुमच्या लाभभावात गुरु आणि विद्या व प्रेमाच्या भावात चंद्र असल्याने हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. कोर्ट-कचेरीत अडकलेले एखादे प्रकरण निकाली निघाल्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळू शकते.

मीन राशी (Pisces Horoscope)

गुरु आणि चंद्राचा समसप्तक योग तुमच्यासाठीही खूप लाभदायक ठरू शकतो. या योगामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहू शकते. आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. काही लोक भविष्यासाठी नवीन योजना आखताना दिसू शकतात. आई-वडिलांच्या सहकार्याने काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. तसेच अध्यात्मिक विषयांबद्दल तुमची आवड वाढू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)