Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाचे स्वतःचे वेगळे महत्त्व सांगण्यात आले आहे. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा अंदाज लावला जातो. काही ठरावीक तारखांना जन्मलेल्या लोकांना प्रत्येक वळणावर नशिबाची साथ मिळते आणि हे लोक स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आयुष्यात मोठे यश मिळवतात. स्वत:चा समजूतदारपणा आणि योग्य रणनीती वापरून हे लोक आर्थिक क्षेत्रातही उत्तम स्थान प्राप्त करू शकतात.

या’ तारखांना जन्मलेल्या लोकांवर असते देवी लक्ष्मीची कृपा

अंकशास्त्रानुसार, ७ हा मूलांक असलेले लोक खूप भाग्यवान मानले जातात. हे लोक स्वतःच्या कष्टाने आपले नशीब बदलण्याची ताकद ठेवतात. जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक ७ मानला जातो. अंकशास्त्रात मूलांक ७ चा संबंध केतू ग्रहाशी जोडला गेला आहे. त्यामुळेच या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात सखोलता, आध्यात्मिक विचार, विश्लेषण करण्याची उत्तम क्षमता आणि काहीतरी वेगळे करण्याची वृत्ती दिसून येते.

आर्थिक जीवनात निर्माण करू शकतात मजबूत ओळख

मूलांक ७ चे लोक पैशाच्या बाबतीत नेहमी विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. कोणत्याही गोष्टीत लगेच धोका पत्करण्याऐवजी ते प्रथम त्याचे फायदे आणि तोटे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हीच सवय पुढे जाऊन, त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत करते. त्यांच्यासाठी पैसा ही फक्त खर्च करण्याची गोष्ट नसून, भविष्यातील योजनांचा विचार करून आर्थिक निर्णय घेणे त्यांना आवडते. योग्य संधी आणि दिशा मिळाली, तर हे लोक उत्तम कमाई करू शकतात.

नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त यश मिळू शकते?

मूलांक ७ च्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्वतःच्या वेगळ्या विचाराने काम करायला आवडते. त्यामुळे संशोधन (रिसर्च), तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी), लेखन, शिक्षण, सल्लागार, अध्यात्म किंवा जिथे स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळते, अशा क्षेत्रांत ते उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. अर्थात, याचा अर्थ असा नाही की, मूलांक ७ असणारी प्रत्येक व्यक्ती व्यवसायातच यशस्वी होईल. यश हे मोठ्या प्रमाणावर त्या व्यक्तीचे कष्ट, कौशल्य, परिस्थिती आणि योग्य निर्णयांवर अवलंबून असते.

पैसे कमावण्यासह बचतीचीही असते क्षमता

अंकशास्त्रात मूलांक ७ बद्दल असे म्हटले जाते की, हे लोक पैशांच्या बाबतीत व्यवहार्य दृष्टिकोन ठेवतात. विनाकारण खर्च करण्याऐवजी गरज आणि भविष्य लक्षात घेऊन खर्च करणे त्यांना आवडते. जर या लोकांनी नियमित बचत आणि योग्य आर्थिक नियोजनावर भर दिला, तर वेळेनुसार ते आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत करू शकतात.

अचानक मिळतो आर्थिक लाभ

मूलांक ७ चा संबंध अनपेक्षित घटनांशीही जोडला जातो. त्यामुळे अंकशास्त्रानुसार, यांच्या आयुष्यात कधी कधी अशा संधी येतात, ज्यांची त्यांनी आधी अपेक्षाही केलेली नसते. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय या संधींचे मोठ्या आर्थिक लाभात रूपांतर करू शकतो. तरीही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय फक्त मूलांकाच्या आधारावर घेऊ नये.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)