Guru Asta Negative Impact: गुरु १५ जुलैपासून अस्त होणार असून ९ ऑगस्टपर्यंत कर्क राशीत अस्त अवस्थेत राहतील. सध्या गुरुचा कर्क राशीतील गोचर ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. या काळात सूर्य कर्क राशीत गुरुच्या अगदी जवळ आल्यामुळे गुरु अस्त होतील. त्यामुळे गुरुचा शुभ प्रभाव कमी होईल आणि शास्त्रानुसार सर्व शुभ कामांवर काही काळासाठी विराम लागेल.

विवाह, मुंज, मुंडन यांसारखे शुभ कार्य होणार नाहीत. याच काळात चातुर्मासालाही सुरुवात होईल. तसेच गुरु अस्त झाल्यामुळे ज्या राशींना कर्क राशीतील गुरुचा लाभ मिळत होता, त्यांना काही अडचणी आणि लाभात घट जाणवू शकते. चला तर मग जाणून घेऊया, कर्क राशीतील गुरु अस्त होण्याचा कोणत्या राशींवर विशेष परिणाम होणार आहे.

कर्क राशी (Cancer Horoscope)

गुरु कर्क राशीत राजयोग तयार करत आहेत, पण अस्त झाल्यामुळे त्यांचा शुभ प्रभाव कमी होईल. त्यामुळे गेल्या महिन्यापासून सुरू असलेले यश आणि प्रगतीचे योग काही काळासाठी थांबू शकतात. अचानक सुरू असलेल्या कामांमध्ये विलंब होऊ शकतो.

आर्थिक योजनांमध्येही काही अडचणी आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. तुमच्या स्वभावात चिडचिड वाढू शकते, त्यामुळे जवळच्या लोकांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात कोणताही मोठा व्यवहार किंवा आर्थिक करार करण्याचे टाळावे. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि धोकादायक कामांपासून दूर राहा. वडीलधारी व्यक्ती आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळत राहील, त्यामुळे त्यांचा सल्ला जरूर घ्या.

मकर राशी (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना गुरुच्या सातव्या दृष्टीचा लाभ मिळत आहे. मात्र गुरु अस्त झाल्यामुळे अचानक कामांमध्ये अडथळे आणि तणाव वाढू शकतो. भागीदारीत काम करत असाल तर खूप सावध राहावे लागेल. तुमचे विरोधक आणि स्पर्धक तुमच्या योजना बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. नोकरी किंवा कामात बदल करण्याचा विचार करत असाल तर सर्व गोष्टी नीट तपासूनच निर्णय घ्या. सरकारी कामांमध्ये निष्काळजीपणा करू नका आणि कोणताही धोका पत्करू नका, अन्यथा अडचणी येऊ शकतात. आपल्या कामावर पूर्ण लक्ष ठेवा, कारण वरिष्ठ तुमच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

कर्क राशीत गुरु अस्त होणे तुमच्यासाठीही फारसे शुभ नाही. तुमच्या राशीचा स्वामी गुरु अष्टम भावात असून आता अस्तही होणार आहे. त्याचबरोबर या काळात सूर्यही तुमच्या राशीपासून अष्टम भावात असतील, त्यामुळे कामाच्या ठिकाणी तणाव वाढू शकतो. करिअरमध्ये कोणताही मोठा निर्णय खूप विचार करूनच घ्या, अन्यथा अडचणी येऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. उपचारांवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. वाहन आणि प्रवासावरही खर्च वाढू शकतो. नातेसंबंध जपताना संयम आणि समजूतदारपणा ठेवावा, कारण काही अनपेक्षित अडचणी समोर येऊ शकतात.

मीन राशी (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी गुरु अस्त होणे अधिक कठीण ठरू शकते. कारण सध्या तुमच्या राशीत शनिचा गोचर सुरू असून साडेसातीही सुरू आहे. त्यात गुरु पंचम भावात असल्यामुळे साडेसातीचा प्रभाव काही प्रमाणात कमी होत होता. मात्र गुरु अस्त झाल्यामुळे साडेसातीचा प्रभाव वाढू शकतो. त्यामुळे करिअर आणि कामात यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक लाभ सामान्य राहील, पण खर्च वाढू शकतो. मुलांशी संबंधित गोष्टींमुळे चिंता वाढू शकते. विद्यार्थ्यांना मेहनतीप्रमाणे यश मिळणार नाही, त्यामुळे निराशा येऊ शकते. म्हणून अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)