June Horoscope: ज्योतिषशास्त्रात केतूला रहस्य, अध्यात्म, अचानक घडामोडी आणि कर्मफळाचा कारक ग्रह मानलं जातं. जेव्हा केतू आपली चाल, रास किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम फक्त वैयक्तिक आयुष्यापुरता मर्यादित राहत नाही, तर करिअर, आर्थिक स्थिती, कौटुंबिक नातेसंबंध आणि मानसिक स्थितीवरही दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर २९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजून १६ मिनिटांनी केतू मघा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करत आहे. ही स्थिती ३० जून २०२६ पर्यंत राहणार असून या काळात काही राशींनी विशेष सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
मघा नक्षत्राचा संबंध पितर, मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा आणि वारसा यांच्याशी जोडला जातो. तर केतू वैराग्य आणि अचानक बदलांचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे या दोघांच्या संयोगामुळे अनेकांच्या आयुष्यात अचानक चढ-उतार येऊ शकतात. ज्योतिष गणनेनुसार या काळात काही राशींनी निर्णय घेताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, कारण छोट्या चुकीचाही मोठा परिणाम होऊ शकतो.
मघा नक्षत्रात केतूचा कसा राहील प्रभाव?
ज्योतिषाचार्यांच्या मते मघा नक्षत्रातील केतूचं गोचर व्यक्तीला आत्मपरीक्षण करण्याकडे वळवतं. अनेकांना करिअर, नातेसंबंध आणि आयुष्यातील ध्येयांबाबत नव्याने विचार करण्याची गरज जाणवू शकते. काही प्रकरणांमध्ये जुने वाद पुन्हा समोर येऊ शकतात, तर काहींना मान-सन्मान आणि प्रतिष्ठेशी संबंधित बाबतीत जास्त सावध राहावं लागू शकतं. हा काळ घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा संयम आणि शहाणपणाने वागण्याचा संकेत देतो. विशेषतः आर्थिक बाबी आणि व्यावसायिक आयुष्यात विचारपूर्वक पावलं उचलणं फायदेशीर ठरेल.
मेष राशी (Aries Horoscope)
बनलेली कामं अडकू शकतात
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक मानला जात आहे. बऱ्याच दिवसांपासून पूर्ण होण्याची अपेक्षा असलेल्या कामांमध्ये अचानक उशीर किंवा अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी छोट्या चुका मोठ्या समस्येचं रूप घेऊ शकतात.
व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन गुंतवणूक किंवा विस्ताराचे निर्णय विचार करून घ्यावेत. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. मानसिक ताण आणि डोकेदुखीसारख्या समस्या वाढू शकतात. या काळात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं टाळलेलं बरं.
कर्क राशी (Cancer Horoscope)
खर्च आणि मानसिक ताण वाढू शकतो
कर्क राशीच्या लोकांसाठी केतूचं हे नक्षत्र परिवर्तन मानसिकदृष्ट्या काही ताण निर्माण करू शकतं. आर्थिक बाबतीत सावध राहणं गरजेचं आहे, कारण अचानक खर्च वाढण्याची शक्यता दिसत आहे.
कुटुंब आणि काम यामध्ये समतोल राखणं या काळातील सर्वात मोठं आव्हान ठरू शकतं. अनेक वेळा परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की तुम्हाला संयमाने वागावं लागेल. ज्योतिषानुसार हा काळ भावनिक निर्णय घेण्यापेक्षा व्यवहारिक विचार करण्याचा आहे. अनावश्यक वादांपासून दूर राहणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
मकर राशी (Capricron Horoscope)
करिअर आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात
मकर राशीच्या लोकांसाठी हा गोचर मिश्र पण आव्हानात्मक परिणाम देणारा मानला जात आहे. व्यवसाय किंवा नोकरीत मेहनतीनुसार परिणाम मिळायला वेळ लागू शकतो. काही योजना अपेक्षेप्रमाणे पुढे सरकणार नाहीत, त्यामुळे निराशा जाणवू शकते.
व्यवसाय वाढवण्याच्या योजनांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. तसेच प्रेमसंबंधांमध्ये संयम आणि समजूतदारपणाची गरज राहील. आर्थिक बाबतीत धोका पत्करणं टाळलेलं बरं. बोलताना शब्दांचा वापर विचारपूर्वक करा, कारण छोट्या गोष्टीवरूनही वाद होऊ शकतो.
या काळात काय करावं?
ज्योतिष मान्यतेनुसार केतूचा प्रभाव संतुलित ठेवण्यासाठी संयम, शांतता आणि आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष देणं फायदेशीर मानलं जातं. नियमित ध्यानधारणा, पितरांचा सन्मान आणि गरजू लोकांना मदत करणं यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळू शकते. तसेच मोठे आर्थिक किंवा करिअरशी संबंधित निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं उपयोगी ठरेल.
केतूचा मघा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणातील प्रवेश काही राशींसाठी आत्मपरीक्षण आणि सावध राहण्याचा काळ घेऊन आला आहे. विशेषतः मेष, कर्क आणि मकर राशीच्या लोकांनी ३० जून २०२६ पर्यंत आपल्या निर्णयांवर, खर्चांवर आणि वागणुकीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. संयम आणि शहाणपणाने पुढे गेल्यास संभाव्य अडचणींचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
