Shukra Nakshatra Parivartan 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन, वैभव, सौंदर्य, भोगविलास, कला व प्रेमाचा कारक ग्रह मानला जातो. दैत्यांचा गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शक्तिशाली ग्रहाची प्रत्येक हालचाल राशींच्या लोकांवर सूक्ष्म प्रभाव टाकते, असा समज आहे. सध्या शुक्र वृश्चिक राशीत स्थित असून, ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३४ वाजता तो ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात तो २० डिसेंबरपर्यंत राहील आणि नंतर मूळ नक्षत्राकडे गमन करील.
ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी बुध आणि राशि वृश्चिक असल्याने या काळात भावनात्मक गतिशीलता, आर्थिक बदल, कुटुंबातील नवे प्रसंग व व्यावसायिक प्रगती घडू शकते, अशी ज्योतिषीय चर्चा आहे. मंगळ, सूर्य व बुध यांच्या संगतीत शुक्र प्रवेश करणार असल्याने काही राशींच्या लोकांना याचा विशेष लाभ होऊ शकतो. कोणत्या राशींचे लोक भाग्यवान ठरू शकतील? चला पाहूया…
शुक्रदेवांच्या चालीनं या राशींना मिळणार प्रेम, पैसा आणि अपार समाधान?
१. सिंह
शुक्राचा हा प्रवास चौथ्या भावात होत असल्याने सिंह राशीच्या लोकांसाठी भौतिक सुख, घरगुती समाधान आणि मान-सन्मान वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या काळात घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे कुटुंबासोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्राशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो, ज्यातून आर्थिक फायद्याची शक्यता वाढू शकते. व्यवसायात नवीन ऑर्डर, मोठे व्यवहार आणि गुंतवणुकीची संधी येऊ शकते. वैवाहिक जीवनात सौहार्दता, तर प्रेमसंबंधात जवळीक वाढण्याची चर्चा आहे.
२. कन्या
शुक्राचा प्रवास कन्या राशीच्या तृतीय भावात होत असल्याने कन्या राशीच्या लोकांची धैर्य, संवादकौशल्य, निर्णयक्षमता वणि नातेसंबंध या सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा होण्याची ज्योतिषीय शक्यता आहे. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना नवीन प्रोजेक्ट्स, उत्तम संधी आणि वरिष्ठांची पाठराखण मिळू शकते. तुमच्या मेहनतीला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. बौद्धिक क्षमतांचा विस्तार होऊ शकतो, ज्यामुळे निर्णय अधिक प्रभावी ठरतील. कुटुंब आणि मित्रांचा आधार मिळेल, त्यामुळे अडथळे सहज दूर होतील. जीवनसाथीसोबत नाते अधिक दृढ होण्याचे संकेत आहेत.
३. मकर
शुक्राचा हा प्रवास अकराव्या भावात म्हणजेच लाभ भावात होत आहे. त्यामुळे मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत उत्साहवर्धक ठरू शकतो. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या इच्छांची पूर्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशेषतः परदेशी व्यवसाय किंवा नोकरीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या परिश्रमाची दखल घेतली जाईल आणि पदोन्नती, बोनस किंवा नवा फायदा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवे स्रोत उघडतील, भागीदारीतील प्रकल्प लाभदायक ठरू शकतात. लव्ह लाइफमध्ये स्थिरता येईल आणि नातेसंबंधात आत्मविश्वास वाढेल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
