Shri Krishna Janmashtami Puja Vidhi 2026 : कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. या सणाची भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. मध्यरात्री कृष्णाचा जन्मसोहळा साजरा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला, रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री झाला होता. त्यामुळे जन्माष्टमीला मध्यरात्री पूजा केली जाते. तसेच अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राचा संयोग शुभ मानला जातो. या शुभ मुहूर्तावर विधीपूर्वक श्रीकृष्णाची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर यावर्षी ४ सप्टेंबर २०२६ रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. चला तर मग, जाणून घेऊया जन्माष्टमीचे महत्त्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त…
कृष्ण जन्माष्टमी २०२६ शुभ योग
यावर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २ वाजून २५ मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी ५ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटांनी संपेल. तारखेनुसार, कृष्ण जन्माष्टमी शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी साजरी केली जाईल. याव्यतिरिक्त यादिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीतील चंद्र यांचा विशेष संयोग पाहायला मिळणार आहे.
शुभ मुहूर्त
श्री कृष्ण जन्मोत्सवाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त ४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी सुरु होईल ते ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळात तुम्ही लाडू गोपालाची पूजा करू शकता.
जन्माष्टमी पूजा विधी
१. घर आणि देवघराची स्वच्छता
जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी घर आणि देवघर स्वच्छ करून घ्या. देवघरात सुंदर रांगोळी काढून कृष्णाची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती सजवा.
२. बाळकृष्णाला सजवा
बाळकृष्णाला नवीन वस्त्र, दागिने, मोरपिस आणि फुलांची माळ घाला. शक्य असल्यास छोटासा पाळणा सजवा आणि त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवा.
३. नैवेद्य
महाराष्ट्रात जन्माष्टमीला दही, दूध, लोणी, साखर, पोहे, फळे यांसह घरच्या पद्धतीचे गोड पदार्थ नैवेद्याला ठेवले जातात. काही घरांमध्ये गोपाळकाला किंवा दहीहंडीशी संबंधित पदार्थही केले जातात.
४. उपवास
काही भक्त उपवास करतात. काही जण पूर्ण उपवास करतात, तर काही फलाहार करतात. आरोग्याच्या कारणास्तव उपवास करणे शक्य नसल्यास साधा सात्त्विक आहार घेऊ शकता.
५. श्रीकृष्ण जन्माचा सोहळा
जन्माष्टमीच्या रात्री मध्यरात्री १२ वाजता कृष्णजन्म साजरा करण्याची परंपरा आहे. त्या वेळी बाळकृष्णाची पूजा करून आरती केली जाते.
६. अभिषेक
बाळकृष्णाच्या मूर्तीवर दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा पंचामृत अभिषेक करण्याची प्रथा काही घरांमध्ये आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती धुऊन नवीन वस्त्र घालतात.
७. पूजा आणि आरती
बाळकृष्णाला फुले, तुळशीची पाने आणि नैवेद्य अर्पण करा.
८. पाळणा
मध्यरात्री कृष्णजन्म झाल्यानंतर बाळकृष्णाला पाळण्यात ठेवून पाळणा म्हणण्याची महाराष्ट्रात सुंदर परंपरा आहे. कुटुंबातील सर्वजण पाळणा हलवून कृष्णजन्माचा आनंद साजरा करतात.
९. प्रसाद
पूजा आणि आरती झाल्यानंतर नैवेद्याचा प्रसाद सर्वांना वाटला जातो. त्यानंतर घरच्या परंपरेनुसार उपवास सोडला जातो.
(टीप: महाराष्ट्रात जन्माष्टमीच्या पूजा-विधीत घराण्यानुसार आणि प्रदेशानुसार फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील पारंपरिक पद्धतीला प्राधान्य देणे योग्य आहे.)
