Kumbh Horoscope March: कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. कुशाग्र बुद्धी, संशोधक वृत्ती, ज्ञानलालसा हे शनीचे गुण कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा आपल्यात असतो. आपल्या आकलनशक्तीला आणि पृथक्करण शक्तीला तोड नाही. स्मरणशक्ती देखील उल्लेखनीय असते. अशा शांत, सोशिक आणि बुद्धिजीवी कुंभ राशीला मार्च महिना नेमका कसा जाईल याचा आढावा घेऊया…
वर्षभरातील महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत (Kumbh March Horoscope)
यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल चतुर्थातील वृषभ राशीतून भ्रमण करेल. नेपच्यून आणि शनी द्वितीयातील मीन राशीतून भ्रमण करतील. कुंभ राशीला शनीच्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा आहे. प्लूटो पूर्ण वर्ष मकरेतून भ्रमण करेल. गुरू पंचमातील मिथुनेतून भ्रमण करत आहे. गुरुबल उत्तम आहे.
१ जूनला गुरू षष्ठातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडे कमजोर झाले तरी गुरू त्याच्या उच्च राशीतून भ्रमण करत असल्याने लाभकारक असेल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू सप्तमातील सिंह राशीत प्रवेश करेल. गुरुबल चांगले होईल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर राशीत आणि कर्क राशीत प्रवेश करतील.
कुंभ राशीसाठी असा असेल मार्च महिना… (Aquarius Horoscope for March 2026)
होळी आणि रंगपंचमी मिश्र रंगांची असेल. आनंदासोबत ताण असेल तर अडचणीसह मार्गही दिसेल. विद्यार्थी वर्गाला हिमतीने पुढे जायचे आहे. खचून चालणार नाही. अभ्यास, सातत्य आणि चिकाटी यांचे चांगले फळ मिळेल. नोकरी व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. परदेशगमनाचा योग आहे. गुढीपाडवा नवी उमेद आणि आत्मविश्वास जागरूक करेल.
विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील. सुयोग्य स्थळाकडून होकार येईल. नाते फुलेल. विवाहित दाम्पत्यांच्या जबाबदाऱ्या वाढतील. संतती प्राप्तीच्या प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक अडचणींना तोंड देत आगेकूच करत रहाल. मित्र परिवार हाकेसरशी धावून येईल. गुंतवणूकदारांना उत्तम गुरुबलाचा लाभ मिळेल. भरघोस परतावा मिळेल. जागेचे व्यवहार फायदेशीर होतील. ओळखीतून झालेल्या व्यवहारात चांगला लाभ होईल. वाहन सुख मिळेल.
– ज्योतिषी सोनल चितळे
