Kumbh June Rashibhavishya 2026: कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. कुशाग्र बुद्धी, संशोधक वृत्ती, ज्ञानलालसा हे शनीचे गुण कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा आपल्यात असतो.

आपल्या आकलनशक्तीला आणि पृथक्करण शक्तीला तोड नाही. स्मरणशक्ती देखील उल्लेखनीय असते. अशा शांत, सोशिक आणि बुद्धिजीवी कुंभ राशीला जून महिना कसा जाईल याचा आढावा घेऊया…

वर्षभरातील महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत (Kumbh Rashibhavishya June)

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल चतुर्थातील वृषभ राशीतून भ्रमण करेल. नेपच्यून आणि शनी द्वितीयातील मीन राशीतून भ्रमण करतील. कुंभ राशीला शनीच्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा आहे. प्लूटो पूर्ण वर्ष मकरेतून भ्रमण करेल.

गुरू पंचमातील मिथुनेतून भ्रमण करत आहे. गुरुबल उत्तम आहे. १ जूनला गुरू षष्ठातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडे कमजोर झाले तरी गुरू त्याच्या उच्च राशीतून भ्रमण करत असल्याने लाभकारक असेल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू सप्तमातील सिंह राशीत प्रवेश करेल. गुरुबल चांगले होईल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर राशीत आणि कर्क राशीत प्रवेश करतील.

कुंभ राशीचे जून महिन्याचे राशिभविष्य (Aquarius Horoscope June 2026)

१ जूनला गुरू षष्ठातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमी होईल पण गुरू आपल्या उच्च राशीत असल्याने गुरुचे पाठबळ चांगलेच मिळेल. साडेसातीचा प्रभाव कमी होईल. विद्यार्थी वर्ग आपल्या बुद्धीच्या आणि जिद्दीच्या जोरावर मोठी मजल मारेल. अभ्यासात प्रगती कराल. नवे विषय, संकल्पना आत्मसात कराल. नोकरी व्यवसायात प्रगतीपथावर आगेकूच कराल. आर्थिक बाजू भक्कम होईल.

विवाहविषयक कार्यात प्रगती कराल. सुयोग्य जोडीदाराची निवड कराल. कौटुंबिक कलह, वाद, मतभिन्नता दूर सारून आलेल्या परिस्थितीचा सामना कराल. गुंतवणूकदारांना भरघोस लाभ होईल. अभ्यासपूर्वक गुंतवणूक भविष्यात कामी येईल. जागेबाबतचे, वडिलोपार्जित जमिनीचे कामकाज धीम्या गतीने पुढे जाईल. मानसिक ताण हलका करण्यासाठी छंद जोपासवेत. मित्र मंडळींच्या भेटीगाठी लाभकारक ठरतील.

– ज्योतिषी सोनल चितळे