Luxurious Zodiac Signs : १२ पैकी अशी एक खास रास आहे, ज्या राशीच्या व्यक्तींमध्ये सूर्यासारखे तेज आणि त्या व्यक्ती जिथे जातात, तिथे त्यांची एक वेगळीच चमक दिसून येते. समाजात त्यांना प्रचंड आदर मिळतो, ऐषारामाचे जीवन जगतात. ही रास सिंह रास म्हणून ओळखली जाते. सिंह राशीचा स्वामी रवी आहे. रवी भरपूर ऊर्जा, उत्साह व प्रकाश देतो, त्याचप्रमाणे सिंह राशीच्या व्यक्तींकडे स्फूर्ती अन् आशा असते, भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो.
सिंह राशीचे लोक बुद्धिमान, आत्मविश्वासू, निर्भय, स्वाभिमानी आणि मेहनती असतात. त्यांच्यात असणाऱ्या या सगळ्या गुणांमुळे या व्यक्ती जीवनात मोठे यश मिळवतात. या व्यक्तींचे वागणे, बोलणे राजासारखे दिमाखदार आणि डौलदार असते. अधिकार गाजवायला त्यांना आवडते. काही वेळा इतरांना आपला बडेजाव दाखवण्याची त्यांची धडपड सुरू असते.
‘खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी’ या तत्त्वानुसार वागतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींमध्ये जन्मजात नेतृत्वगुण असतात. जिथे जातात तिथे ते अगदी पुढाऱ्याप्रमाणे सगळी परिस्थिती व्यवस्थित सांभाळतात. त्यांचा आवाज खणखणीत असतो, जो सर्वांवर मोठा प्रभाव पाडतो. या राशीच्या लोकांना साधे जीवन आवडत नाही. त्यामुळे ऐषारामाचे जीवन मिळवण्यासाठी ते भरपूर मेहनत घेतात.
स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणे पसंत करणाऱ्या या राशीचे लोक जोखीम पत्करायला कधीही घाबरत नाहीत. म्हणूनच कालांतराने त्यांना मोठे यश, प्रसिद्धी मिळते. त्यांनी एकदा एखादे काम करायचे ठरवले की, ते पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसत नाहीत. सरकारी नोकऱ्या, राजकारण, प्रशासकीय सेवा किंवा व्यवसाय आदी अनेक क्षेत्रांत ते यशस्वी होताना दिसतात. तर सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव असा काहीसा असतो आणि स्वभावातील अशा काही गुणांमुळे या राशीच्या लोकांमध्ये सूर्यासारखे तेज असते…
