Tula Rashi October Rashibhavishya : तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे. आकर्षकपणा, नेटकेपणा, सौंदर्य, कला यांचे उपभोक्ते अशी तुमच्या राशीची वैशिष्ट्ये आहेत. व्यापारी तत्वाचे आणि न्यायप्रिय, बुद्धिवादी असे तुमच्या राशीचे वर्णन सार्थ ठरते. आपण नेहमी संकटातून मार्ग काढत पुढे जाता. बौद्धिक रास असल्याने आपली बुद्धिमत्ता उच्च प्रतीची असते. पण, कर्तव्य आणि प्रेम यांच्यात आपण योग्य समतोल साधण्यातही तुम्ही माहीर असता.
तुम्हाला प्रियजनांचा सहवास आवडतो, तुमची कल्पनाशक्ती प्रबळ असते. समतोल राखणे आणि अस्थिरतेतही स्थिरता शोधणे हा तुमचा विशेष स्थायी भाव आहे. नवनवीन गोष्टी शिकण्याची, त्यांचा उपयोग करण्याची तुम्हाला भरपूर आवड असते. प्रपंच आणि परमार्थाचा अत्यंत उत्तमरित्या समतोल तुम्ही साधत असता. शिस्तीच्या वेळी शिस्त आणि आनंदाच्या वेळी मनसोक्त निखळ आनंद उपभोगणारी तुमची रास असते. त्यामुळे नेहमी हसतमुख आणि समाजप्रिय असलेल्या तुमच्या राशीचा ऑक्टोबर महिना कसा जाईल जाणून घेऊ.
तूळ राशीला ऑक्टोबर महिना कसा जाणार?
पितृपक्षात विशेष कार्यशील रहाल. रेंगाळलेली कामे मार्गाला लागतील. विद्यार्थी वर्गाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. नवे विषय आत्मसात कराल. नव्या संकल्पना नीट समजून घ्याल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक पावले उचलाल. बढती मिळेल, विवाह जमेल. ओळखीतून नातेसंबंध जुळतील. विवाहित मंडळींनी कामकाज आणि व्यस्त दिनक्रमातून कुटुंबासाठी वेळ राखून ठेवावा लागेल.
घटस्थापना, दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा उत्साह वाढवतील. गुंतवणूक करताना विशेष सतर्कता बाळगावी. नजरचूक झाल्यास मोठा फटका बसू शकतो, सावधान! घराबाबतचे व्यवहार अंतिम निर्णयाप्रत जातील. अडचणींवर मात करत पुढे जावे लागणार आहे हे ध्यानात असू दयावे. नाकाचा घोळणा फुटणे, घसा खवखवणे असे त्रास उदभवतील. वायुप्रदूषणाचा प्रभाव जाणवेल.
