Love Horoscope: सप्टेंबर महिन्यात मंगळ व गुरूच्या प्रभावामुळे अनेक राशींच्या भाग्यात नवीन नात्यांचा योग आहे तर काही राशींना मात्र हा महिना आत्मसुख अनुभवण्याची शिकवण देऊन जाईल. कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी या महिन्यात प्रेम व नाती सकारत्मक बदल घेऊन येतील तर कोणत्या राशींना स्वभावात किंचित बदल करावे लागतील हे सविस्तर जाणून घ्या..

सप्टेंबर महिन्याचे प्रेम भविष्य

मेष

या महिन्यात तुम्हाला जोडीदारापेक्षा स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्यायला हवे. तुमची बहुतांश कामे चिडचिड केल्यास अडून राहतील, त्यापेक्षा हसरा चेहरा व गोड बोलून काम करणे फायद्याचे ठरेल. जर तुम्हाला तुमच्या आनंदासाठी जोडीदाराशी स्पष्ट संवाद करता आला तर अशी संधी सोडू नका.

वृषभ

तुम्हाला या महिन्यात तुमचे मन सर्वात महत्त्वाची साथ देईल. जोडीदाराच्या छोट्या चुका सुद्धा डोळ्याआड करू नका कारण या चुका कदाचित वास्तवाचे संकेत असतील. जर तुमचे सतत वाद होत असतील तर जोडीदारासोबत किंवा एकट्याने काही दिवसांचा ब्रेक घ्या.

मिथुन

वैवाहिक सुखासाठी हा महिना अनुकूल आहे. तुमचे वाद दूर होण्यास मदत होतील मात्र तुम्हाला थोडी तडजोड करावी लागेल. तुम्हाला वर्तमानात दोन पाऊलं मागे येऊन भविष्यात आनंदी राहता येईल.

कर्क

तुम्हाला जोडीदाराच्या नातेवाईकांकडून किंचित त्रास सहन करावा लागेल. शक्य झाल्यास तुमचे वाद आपापसात मिटवायचा प्रयत्न करा अन्यथा मध्यस्थांमुळे वाद चिघळले जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला जोडीदाराची साथ मिळेल मात्र तुम्ही विश्वास ठेवणे गरजेचे आहे. विनाकारण संशय घेणे टाळावे.

सिंह

तुम्हाला अनपेक्षित सुख मिळण्याचे योग आहेत. तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती या महिन्यात प्रेमाची कबुली देण्याची शक्यता आहे. तुम्हाला अपेक्षित गोष्टी घडतीलच असे नाही मात्र तुम्हाला नकळत आनंद मिळेल, अशावेळी तुम्ही जे हातात नाही त्यामागे धावणे बाजूला ठेवायला हवे.

कन्या

एकटेपणाचा महिना आहे. या महिन्यात तुमच्या मानसिक स्थितीत चढउतार येऊ शकतात. तुम्हाला जोडीदार असूनही काही क्षणी एकटे वाटू शकते मात्र अशावेळी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. महिन्याच्या शेवटी ही स्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत. महिन्याच्या मध्यात तुमचा जोडीदार तुमच्यासाठी खास सरप्राईज प्लॅन करून तुम्हाला खुश करेल.

तूळ

सिंगल मंडळींनी थोडी हिंमत दाखवल्यास तुम्हाला हवी असणारी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. वैवाहिक जीवनात मात्र खटके उडण्याची शक्यता आहे. अगदी लहानसहान मुद्द्यांवर भांडणं होऊ शकतात मात्र संयम बालगल्यास तुम्ही हा महिना आनंदी राहाल. तुमची भांडणं बहुतांश वेळा तुमच्याच चुकांमुळे होतील पण इतरांनी चूक दाखवल्यामुळे तुमचा संताप होऊ शकतो.

वृश्चिक

या महिन्यात वैयक्तिक स्तरावर मनस्थिती उत्तम राहील मात्र तुमच्या पार्टनरची चिडचिड तुम्हाला समस्या ठरू शकते. जोडीदाराच्या तक्रारींना उडवून लावू नका, शक्य असेल तितकं आणि जमेल तेवढं समस्या ऐकण्याचा व सोडवण्याचा प्रयत्न करा.

धनु

तुम्ही तुमच्या नात्यातील सर्वात सुंदर काळ या महिन्यात जगाल असे संकेत आहेत. जोडीदारासह प्रवासाचा योग आहे. तुम्हाला अत्यानंदामुळे प्रसंगी आपण या आनंदाला पात्र आहोत का असा प्रश्न पडू शकतो पण तुम्ही ध्यानधारणेची सवय लावल्यास मनःशांती मिळेल.

मकर

मकर राशीच्या मंडळींनी अपेक्षा न करता जोडीदाराशी चांगले वागावे. तुम्हाला नातेसंबंध उत्तम जपता येतील केवळ तुम्ही समोरच्याला व्यक्त होण्याची संधी द्यायला हवी. तुम्ही जोडीदारासह एखाद्या नेहमीच्या ठिकाणी फिरायला जाऊनही गप्पा मारून अधिक जवळीक अनुभवाल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना आत्मसुख शोधण्याचा मार्ग आहे. अनेक वेळेस तुम्ही जोडीदाराला समजून घेण्यासाठी प्रयत्न कराल पण तुम्हाला साथ मिळणार नाही. तुमच्या अपेक्षांमुळे मानसिक स्थिती दुःखी होऊ शकते. हे टाळण्यासाठी स्वतःसोबत काही दिवस घालवा.

मीन

तुमच्या आयुष्यात नवीन नाते निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. तुम्ही ईर्षा करत राहील्यास तुमचे नाते अस्थिर होईल. तुमचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे, यासाठी जोडीदाराची सुद्धा साथ महत्त्वपूर्ण ठरेल. या महिन्यात नाती टिकवण्यासाठी तुम्हाला पुढाकार घेऊन संवाद साधावा लागेल.

(टीप- सदर लेख माहितीवर आधारीत आहे, अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)