Shukra Gochar 2026 Impact on Zodiac Signs: मकर संक्रांती हा सण उत्तर भारतासह देशभरात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, हा दिवस नव्या ऊर्जेचा, नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते आणि गूळ, खिचडी, रेवडी यांसारखे पदार्थ अर्पण केले जातात. पंचांगानुसार, २०२६ साली मकर संक्रांती १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, या सणाच्या अवघ्या एक दिवस आधी शुक्र ग्रह आपला गोचर करणार असल्याचे ज्योतिषीय गणनांतून दिसते.

दृक् पंचांगानुसार, १३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे शुक्र देव मकर राशीत प्रवेश करतील. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य, सुखसोयी आणि भौतिक आनंदाचा कारक मानला जातो, त्यामुळे शुक्राचा गोचर अनेकांच्या आयुष्यात सूक्ष्म पण महत्त्वाचे बदल घडवू शकतो, असा अंदाज काही ज्योतिषी व्यक्त करत आहेत. विशेषतः तीन राशींसाठी हा काळ तुलनेने अनुकूल ठरू शकतो, अशी चर्चा आहे.

मकर संक्रांतीपासून ‘या’ राशींना मिळू शकतो लाभ

वृषभ

वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र असल्यामुळे, या राशीवर शुक्राच्या गोचराचा प्रभाव अधिक जाणवू शकतो असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या आसपास होणारे हे ग्रहस्थानांतर वृषभ राशीच्या लोकांना सकारात्मक ऊर्जेचा अनुभव देऊ शकते. मेहनतीने आणि मनापासून केलेल्या कामांमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. वैयक्तिक आयुष्यातही बदल जाणवू शकतात. नातेसंबंधांमध्ये अधिक समजूतदारपणा आणि भावनिक जवळीक वाढण्याचे संकेत आहेत. काहींना आरोग्याशी संबंधित जुन्या तक्रारींमध्ये हळूहळू दिलासा मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तूळ

तूळ राशीवरही शुक्राचा विशेष प्रभाव मानला जातो. मकर संक्रांतीच्या काळात होणारा हा गोचर तूळ राशीच्या लोकांसाठी नव्या आशेचा किरण ठरू शकतो. मागील वर्षात अपूर्ण राहिलेल्या काही इच्छा किंवा योजना पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता दिसते. कुटुंबातील नातेसंबंध अधिक सुसंवादी होऊ शकतात आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. काही लोक नवीन कामाची किंवा भागीदारीत काहीतरी सुरू करण्याचा विचार करू शकतात. धनलाभ होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुलनेने स्थिर आणि संतुलित राहण्याची शक्यता आहे, असे संकेत दिले जात आहेत.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांतीचा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. शुक्राच्या गोचरामुळे आर्थिक बाबींमध्ये काही सकारात्मक बदल जाणवू शकतात, असा अंदाज आहे. घरातील जुने प्रश्न हळूहळू सुटण्याच्या दिशेने जाऊ शकतात. वैवाहिक जीवनात अधिक वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे नात्यातील जिव्हाळा वाढू शकतो. भविष्यासंबंधी योजना आखण्यात उत्साह दिसून येऊ शकतो. काहींना मालमत्ता किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता भासू शकते. आरोग्याच्या बाबतीतही फारशी चिंता करण्याची गरज भासणार नाही, असे ज्योतिषीय संकेत सांगतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)