Mangal Guru Ketu Yuti Ttrigrahi Yog 2026 : दिवाळीत यंदा ग्रहांची स्थिती विशेष आहे. कारण- दिवाळीपूर्वी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुरू ग्रहाने सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश केला आणि तिथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या केतूशी युती केली. आता यापुढे जाऊन मंगळदेखील या दोन ग्रहांबरोबर येत आहे
मंगळ बनवणार त्रिग्रही योग
१२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी मंगळ भ्रमण करून सिंह राशीत प्रवेश करीत आहे, जिथे आधीपासूनच गुरू आणि केतू उपस्थित आहेत. त्यामुळे सूर्याच्या सिंह राशीत मंगळ, गुरू व केतू मिळून त्रिग्रही योग तयार करतील. ज्योतिषशास्त्रानुसार, अग्नी तत्त्वाचा मंगळ हा भूमी आणि आक्रमकतेचा कारक ग्रह आहे. गुरू सुख, सौभाग्य व ज्ञानाचा कारक ग्रह आहे; तर क्रूर ग्रह म्हणून केतू ओळखला जातो. अशा वेळी या तीन ग्रहांच्या युतीने काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक उलथापालथ घडू शकते. त्यामुळे या लोकांनी १२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ दरम्यान काळजी घ्यावी. ५ डिसेंबरला केतूचे भ्रमण होताच ही युती संपुष्टात येईल.
‘या’ ४ राशींच्या लोकांनी राहावे सतर्क
१. कर्क : या काळात कर्क राशीच्या लोकांच्या घरात तणाव वाढू शकतो. एखादी लहान कौटुंबिक समस्या त्रस्त करू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या एखाद्या योजनेत किंवा कार्यक्रमात बदल करावा लागू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. जे लोक मालमत्ता, गाडी किंवा एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्या कामात विलंब किंवा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे धीर धरा आणि घाईगडबड करू नका.
२. सिंह : या तीन ग्रहांची युती सिंह राशीतच होत आहे. त्यामुळे थोडा फायदा होईल; पण त्रासही सहन करावा लागू शकतो. तुमचा अहंकार तुमचे नुकसान करू शकतो. काही लोकांना अपघात होण्याची किंवा दुखापत होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक विचारपूर्वक करा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.
३. वृश्चिक : तुमचा निष्काळजीपणा आणि लक्ष विचलित होणे यांमुळे नोकरीत अडचणी वाढू शकतात. वरिष्ठांचे म्हणणे व्यवस्थित ऐका आणि त्याचे पालन करा. घाई करू नका, संयमाने काम घ्या. सरकार किंवा प्रशासनाशी संबंधित कामे अडकू शकतात. आपली महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा.
४. मीन : हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी थोडा कठीण आहे. कारण- शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. कामासह आरोग्याचीही काळजी घ्या. थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. पुरेसे पाणी प्या आणि आरोग्याची काही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
