Mars Pisces Zodiac Sign Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ सध्या त्याच्या अस्त अवस्थेत (शक्ती, ऊर्जा कमी असणाऱ्या अवस्थेत) भ्रमण करत आहे आणि भविष्यात पंचांगानुसार, १८ एप्रिल रोजी मंगळ मीन राशीत जाताच पुन्हा सक्रिय (शक्ती, ऊर्जा जास्त देणाऱ्या अवस्थेत) होईल. मंगळ हा भूमी, शौर्य, पराक्रम आणि क्रोध यांचा घटक मानला जातो. त्यामुळे, मंगळाच्या भ्रमणातील बदलांचा परिणाम या क्षेत्रांवर आणि सर्व राशींवर होतो. पण, मंगळाच्या सक्रिय होण्याचा सकारात्मक परिणाम धनु, वृषभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना जाणवू शकतो. या व्यक्तींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती अनुभवता येऊ शकते.

पंचांगानुसार, १८ एप्रिल रोजी पहाटे १ वाजून ५२ मिनिटांनी, मंगळ ग्रह, गुरूच्या अधिपत्याखालील मीन राशीत उदित होणार आहे. जेव्हा मंगळ या अवस्थेत असतो, तेव्हा त्याचा प्रभाव अधिक शक्तिशाली होतो आणि तो त्याचे पूर्ण लाभही देतो. त्यामुळे, काही या राशींना याचा फायदा होऊ शकतो.

कोणत्या राशींना होईल फायदा

धनु

मंगळाचा उदय तुमच्या राशीसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. मंगळ तुमच्या राशीच्या कुंडलीच्या चौथ्या घरात उदय पावणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुमची ओळख वाढण्याची शक्यता आहे. मालमत्ता किंवा वाहन संबंधित बाबींमध्ये लाभ होण्याचे संकेत, कौटुंबिक पाठिंबाही मिळेल. पण, या काळात तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असेल. कौटुंबिक वाद वाढू शकतात. कोणताही घाईचा निर्णय घेणे टाळा, कारण यामुळे नुकसान होऊ शकते.

वृषभ

मंगळ तुमच्या राशीच्या कुंडलीत उत्पन्न आणि नफ्याच्या घरात उदय पावणार आहे. त्यामुळे, तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हुशारीने गुंतवणूक करा. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. पण, या काळात मित्र किंवा जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते. खर्च अचानक वाढू शकतो.

मिथुन

मंगळाचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. मंगळ तुमच्या राशीच्या कुंडलीच्या कर्म घरात उदय पावणार आहे. त्यामुळे, हा काळ तुमच्या करिअरमध्ये प्रगती घेऊन येणार काळ ठरू शकतो. तुम्हाला नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या संधीही मिळू शकतात. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची चिन्हे आहेत. पण, या काळात कामाचा ताण, मानसिक थकवा जाणवू शकतो. वरिष्ठांशी वाद घालणे टाळा, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही…)