mars entre in pisces : ज्योतिषशास्त्रानुसार, जवळजवळ १८ महिन्यांनंतर ग्रहांचा अधिपती मंगळ, गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहेत. पंचांगानुसार, हे संक्रमण २ एप्रिल २०२६ रोजी होईल. त्याशिवाय, मंगळाचे हे संक्रमण अनेक राशींसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रात, मंगळ आणि गुरू यांना मित्र मानले जाते. म्हणूनच मंगळ आणि गुरू यांच्यातील मैत्रीमुळे संक्रमण विशेषतः शुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ऊर्जा, धैर्य, नेतृत्व, शौर्याचे प्रतीक मानला जातो. तर गुरू हा ज्ञान, समृद्धी, धर्म, विस्ताराचा ग्रह मानला जातो. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या प्रभावाखाली येतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगती, संधी व आर्थिक लाभ घेऊन येतात. त्यामुळे या संक्रमणाचा मेष, धनू, मीन राशीवर सकारात्मक परिणाम होतो. या राशींना त्यांच्या करिअर, व्यवसाय, आर्थिक बाबींमध्ये लाभ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मंगळ आणि गुरूची मैत्री
ज्योतिषशास्त्रात, मंगळ आणि गुरू यांना मित्र ग्रह मानले जातात. मंगळ धैर्य, शक्ती, कार्यक्षमता प्रदान करतो; तर गुरू बुद्धी, मार्गदर्शन, नशिबाचा आधार देतो. जेव्हा मंगळ गुरूच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा हे संयोजन एखाद्या व्यक्तीला धैर्यवान आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम करते. त्यामुळे करिअरच्या नवीन संधी आणि व्यवसायाचा विस्तार करण्याचे मार्ग खुले होतात. ही युती संपत्ती, प्रतिष्ठा, पदोन्नती मिळवण्यासाठी उपयुक्त मानली जाते. कधी कधी अशा ग्रहांच्या संयोजनामुळे अचानक लाभ किंवा नवीन प्रकल्प हातात येण्याची शक्यतादेखील निर्माण होते.
कोणत्या राशींना होईल विशेष लाभ
मेष
या राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी खूप अनुकूल ठरू शकते. हे संक्रमण तुमच्या राशीच्या कुंडलीच्या १२ व्या घरात होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या कारकिर्दीत नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नतीचा समावेश होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा, व्यवसायात असलेल्यांसाठी नवीन गुंतवणूक, फायदेशीर संधी निर्माण होऊ शकतात. पण, यादरम्यान तुम्हाला अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
धनु
गुरू या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे तुमच्यासाठी हा शुभ संकेत ठरेल. हे संक्रमण तुमच्या राशीच्या कुंडलीच्या चौथ्या घरात सुरू होणार आहे. त्यामुळे या काळात व्यवसाय विस्तार, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नोकरीत बदल किंवा नवीन नोकरीच्या संधीदेखील चालून येऊ शकतात. नशिबामुळे प्रलंबित कामेदेखील पूर्ण होऊ शकतात. तुम्ही वाहन किंवा मालमत्तादेखील खरेदी करू शकता. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. तुम्हाला फक्त आळस झटकून कठोर परिश्रम करत राहावे लागतील.
मीन
तुमच्या राशीसाठी, हे संक्रमण आर्थिक आणि करिअर दोन्ही क्षेत्रात प्रगती दर्शवते. हे संक्रमण तुमच्या राशीच्या कुंडलीच्या लग्नाच्या घरात होत आहे. म्हणून या काळात, तुम्हाला नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल, व्यवसायात नवीन भागीदारीचे प्रस्ताव, नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीची शक्यता आहे. आदर आणि सन्मान मिळेल, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. पण, या काळात तुम्हाला तुमच्या रागावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल.
