May Horoscope: पुढचे तीन दिवस सूर्य, मंगळ आणि बुध यांची युती राहणार आहे. या तीन मोठ्या ग्रहांची युती खूप खास मानली जाते. सूर्य आणि मंगळ हे दोन्ही अग्नी तत्त्वाचे ग्रह आहेत. त्यामुळे हे दोन्ही ग्रह एकत्र आल्यावर लोकांमध्ये राग आणि आक्रमकता वाढू शकते. या काळात मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात, पण त्यावर सर्वांची सहमती होणं कठीण जाईल. युद्धासारख्या गोष्टींसाठीही हा काळ योग्य मानला जात नाही.

या राशीत बुध ग्रहही उपस्थित आहे. १२ मे ते १५ मेपर्यंत ही स्थिती राहणार आहे. त्यानंतर अनेक गोष्टी हळूहळू सुधारू लागतील. १५ मे रोजी सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह शुक्राच्या राशीत प्रवेश करतील. या दोन्ही ग्रहांची सध्याची युती काही अडचणी निर्माण करू शकते, पण १५ तारखेनंतर परिस्थिती सामान्य होऊ लागेल.

सूर्य आणि मंगळाची युती करिअरसाठी अनेक नवीन संधी घेऊन येऊ शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आणि नवीन लोकांशी संबंध जोडण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो.

मंगळ हा क्रूर ग्रह मानला जातो, जो आक्रमकता, धाडस, ऊर्जा आणि उत्साहाचं प्रतीक आहे. तर सूर्य ग्रह मान-सन्मान, यश, ताकद आणि गौरवाचं प्रतीक मानला जातो. चला जाणून घेऊया, या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे या राशीच्या लोकांना मान-सन्मान मिळू शकतो. तुमच्या मनात राग किंवा आक्रमकता वाढू शकते, पण त्यातून कोणताही प्रश्न सुटणार नाही. जे झालं ते चांगल्यासाठी झालं असं मानून पुढे जाण्याचा प्रयत्न करा.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

सूर्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि मंगळाच्या ऊर्जेमुळे तुमचे निर्णय प्रभावी ठरतील. तुमचे निर्णय करिअरमध्ये फायदा देऊ शकतात. व्यवसायात तुमच्या कल्पना यशस्वी होण्याची शक्यता आहे. मात्र, कुटुंबात थोडे वाद किंवा मतभेद होऊ शकतात. १५ मेनंतर परिस्थितीत सुधारणा होऊ शकते.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठीही हा काळ चांगला राहू शकतो. नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमची कामं पूर्ण होतील. एखाद्या कामानिमित्त परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. आर्थिक आणि वैयक्तिक दोन्ही बाबतीत ही युती तुम्हाला फायदा देऊ शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)