Budh Swati Nakshatra Gochar 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांचा कारक मानले जाते. त्यामुळे बुधाच्या राशी आणि नक्षत्रातील बदलांचा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचे ज्योतिषशास्त्र सांगते. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच बुध ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार असून, या बदलाचा काही राशींच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. तीन राशींच्या लोकांना या काळात अधिक सावध राहावे लागणार आहे. नोकरी-व्यवसायात अडथळे, आर्थिक नुकसान, रखडलेली कामे आणि कौटुंबिक वाद अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाईघाईने घेणे टाळावे.

बुधाच्या या नक्षत्र परिवर्तनाचा काही राशींवर आव्हानात्मक प्रभाव पडू शकतो. तर मग जाणून घेऊया नेमक्या कोणत्या आहेत या तीन राशी…

कधी होणार बुधाचा स्वाती नक्षत्रात प्रवेश?

वैदिक पंचांगानुसार, बुध ग्रह ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५ वाजून ५३ मिनिटांनी वक्री अवस्थेत पुन्हा एकदा स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. बुध २५ नोव्हेंबरपर्यंत या नक्षत्रात राहतील. त्यानंतर ते पुन्हा विशाखा नक्षत्रात प्रवेश करतील. या संपूर्ण काळात बुध ग्रह तूळ राशीतच विराजमान असतील. बुधाच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींच्या आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

१. कर्क राशी (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचा स्वाती नक्षत्रातील प्रवेश काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. या काळात आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असून, काही ठिकाणी पैसे अडकून पडू शकतात. त्यामुळे आर्थिक नियोजन बिघडण्याची भीती आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी अपेक्षित मान-सन्मान मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. कला, संगीत, साहित्य आणि अभिनय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना अपेक्षित यश मिळण्यात अडथळे येऊ शकतात. विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होण्याची शक्यता असून, परीक्षेतील कामगिरीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

२. तूळ राशी (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचे नक्षत्र परिवर्तन मानसिक तणाव वाढवणारे ठरू शकते. विशेषतः बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजनानुसार कामे पूर्ण न झाल्याने निराशा येऊ शकते. नोकरी करणाऱ्यांनी बोलताना शब्दांचा जपून वापर करावा. सहकारी किंवा वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता असल्याने कोणताही आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. विद्यार्थ्यांनाही अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागू शकतात.

३. मकर राशी (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचा स्वाती नक्षत्रातील प्रवेश काही समस्यांना आमंत्रण देऊ शकतो. नोकरदार व्यक्तींवर कामाचा ताण वाढण्याची शक्यता असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. त्यामुळे कार्यक्षेत्रातील वातावरण तणावपूर्ण राहण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी या काळात गुंतवणुकीबाबत विशेष सावधगिरी बाळगावी. घाईघाईने घेतलेले निर्णय आर्थिक नुकसान घडवू शकतात. कौटुंबिक जीवनातही गैरसमज आणि वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवणे महत्त्वाचे ठरेल. मानसिक शांतता टिकवण्यासाठी अनावश्यक वाद टाळावेत.