Mercury transit 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध हा बुद्धी, शिक्षण, संवाद, व्यवस्थापन, माहिती-तंत्रज्ञान आणि व्यापार यांचा प्रमुख कारक आहे. त्यामुळे बुधाच्या गोचराकडे केवळ वैयक्तिक राशींच्या दृष्टीनेच नव्हे, तर सामाजिक आणि व्यावसायिक घडामोडींच्या अनुषंगानेही पाहिले जाते. येत्या ७ फेब्रुवारीपासून बुध धनिष्ठा नक्षत्रातून बाहेर पडत शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार असून, हा गोचर तब्बल ४५० दिवसांनंतर घडत आहे. विशेष म्हणजे शतभिषा हे राहूचे नक्षत्र असल्याने बुधाचा हा प्रवास अधिक परिणामकारक मानला जात आहे.
बुधाचा शतभिषा नक्षत्रात प्रवेश (Mercury Transit in Shatabhisha Nakshatra)
दृक पंचांगानुसार ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजून ३२ मिनिटांनी बुध शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल आणि १५ फेब्रुवारीपर्यंत या नक्षत्रात वास्तव करेल. कुंभ राशीत असलेला बुध राहूसोबत युतीत असताना राहूच्या नक्षत्रात प्रवेश करत असल्याने निर्णयक्षमता, कल्पक विचार आणि वेगळ्या दृष्टिकोनातून समस्या सोडवण्याची प्रवृत्ती वाढू शकते. चंद्रराशीच्या आधारावर पाहता या गोचराचा सकारात्मक परिणाम विशेषतः मेष, मिथुन आणि तूळ राशींच्या जीवनात जाणवू शकतो.
मेष राशीवर परिणाम (Aries Zodiac)
मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. बुधाच्या प्रभावामुळे निर्णय घेण्याची क्षमता अधिक स्पष्ट होईल. करिअरविषयक बाबींमध्ये नव्या संधी समोर येऊ शकतात. नोकरीत बदल, जबाबदारी वाढणे किंवा नव्या प्रकल्पात सहभाग मिळण्याची शक्यता आहे. संवादकौशल्य सुधारल्यामुळे वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी असलेले संबंध अधिक सुसंवादी राहू शकतात. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचलल्यास फायदा होऊ शकतो.
मिथुन राशीवर परिणाम (Gemini Zodiac)
बुधाचा स्वामित्व असलेल्या मिथुन राशीसाठी हा गोचर विशेष अनुकूल मानला जात आहे. शिक्षण, लेखन, माध्यमे, विपणन, आयटी आणि व्यापार क्षेत्राशी संबंधित जातकांसाठी प्रगतीचे संकेत दिसून येतात. मानसिक स्पष्टता वाढल्यामुळे अभ्यासात एकाग्रता साधता येईल. परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. व्यावसायिक पातळीवर नवीन कल्पना अमलात आणण्याचा आत्मविश्वास वाढेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे ठरेल.
तूळ राशीवर परिणाम (Libra Zodiac)
तूळ राशीच्या जातकांसाठी बुधाचा हा नक्षत्रप्रवेश नातेसंबंध आणि भागीदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी समन्वय वाढेल आणि चर्चेतून मार्ग काढण्याची क्षमता सुधारेल. व्यवसायात भागीदारीत काम करणाऱ्यांना लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती हळूहळू स्थिर होण्याची चिन्हे आहेत. वैयक्तिक आयुष्यात विचारांचा समतोल साधता आल्यास मानसिक समाधान मिळू शकते.
बुध-राहू संयोगामुळे कल्पकता आणि तांत्रिक विचारांना चालना मिळू शकते, मात्र घाईगडबडीचे निर्णय टाळणे आवश्यक ठरेल. अफवा, गैरसमज किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे पावले उचलल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना वस्तुस्थितीची खात्री करूनच पुढे जाणे हितावह ठरेल.
टीप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.

