Mercury North Facing 2025: ग्रहांच्या हालचालींमध्ये बदल झाला की त्याचा परिणाम प्रत्येक राशीवर काही ना काही प्रमाणात जाणवतोच. आता ग्रहांचा राजकुमार बुध उत्तरमुखी होणार असून, ही घटना १९ नोव्हेंबर रोजी पहाटे १२:५१ वाजता घडणार आहे. बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, वाणी, व्यापार आणि व्यवहाराचा कारक मानला जातो, त्यामुळे त्याच्या दिशा बदलण्याचा परिणाम आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात दिसून येतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
ज्योतिषाचार्यांच्या मते, बुधाचा उत्तरमुखी प्रवास अत्यंत शुभ फलदायी मानला जातो, त्यामुळे या काळात काही राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया, कोणत्या ३ राशींचं नशीब या काळात उजळणार आहे
वृषभ (Taurus)
बुध उत्तरमुखी झाल्यानंतर वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसू शकते आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा काळ व्यवसाय विस्ताराचा संधी देणारा ठरू शकतो. जुनी थांबलेली कामं पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल. नोकरीत असलेल्या व्यक्तींना पदोन्नती किंवा पगारवाढीचा लाभ मिळण्याची शक्यता ज्योतिष सांगते. विचारांची स्पष्टता वाढेल आणि निर्णयक्षमता तीव्र होईल.
कन्या (Virgo)
बुध स्वतः कन्या राशीचा स्वामी असल्याने त्याचं उत्तरमुखी होणं या राशीच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या काळात तुमच्या वाणीमध्ये आकर्षण आणि गोडवा वाढेल, ज्यामुळे लोक सहज प्रभावित होतील. पत्रकारिता, लेखन, माध्यम, शिक्षण, पब्लिक रिलेशन किंवा भाषणकला यांच्याशी संबंधित व्यक्तींना मोठा फायदा मिळू शकतो. विद्यार्थी वर्गासाठीही हा काळ विशेष अनुकूल आहे, अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि स्मरणशक्ती वाढेल. बुद्धीची तीव्रता वाढून निर्णय अधिक अचूक होतील.
मकर (Capricorn)
मकर राशीच्या व्यक्तींना बुधाचा उत्तरमुखी प्रवास आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरू शकतो. धनप्राप्तीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात आणि गुंतवणूक, शेअर बाजार किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहार लाभदायी होऊ शकतात. व्यवसायात नवीन भागीदारी निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच परदेशातून काही सकारात्मक बातमी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुमच्या कामगिरीचं कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मान-सन्मान मिळण्याचे योग दिसतात.
या काळात बुधाची कृपा काही राशींवर खास असणार असली तरी इतरांसाठीही हा काळ विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी आणि बुद्धिमत्तेचा योग्य वापर करण्यासाठी उत्तम मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तरमुखी बुधाचा काळ हा नवनवीन सुरुवातींसाठी शुभ मानला जातो आणि कदाचित याच काळात काहींच्या जीवनात सुख, समृद्धी आणि धनवर्षावाचे दिवस येऊ शकतात!
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
