Mithun May Rashibhavishya 2026: मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध बुद्धीचा कारक आहे. चुणचुणीत, हजरजबाबी आणि हुशार असे बुधाचे गुण मिथुन राशीच्या लोकांमध्ये आढळतात. आपली खरी ताकद बोलण्यातच असते. एखाद्याला हाताने नाही तर शाब्दिक फटक्यांनी गारद कराल.
आपले निरीक्षण अगदी बारकाव्यासह असते. विविध विषयात आपणास रस असतो. नवनवीन विषयांची आपणास ओढ असते. स्मरणशक्ती आणि समयसूचकता अफलातून असते. अशा या अस्थिर, अल्लड मिथुन राशीला मे महिना कसा जाईल हे पाहूया.
वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशीबदल असे आहेत..
यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल वृषभ राशीत असेल. नेपच्यून आणि शनी दशमातील मीन राशीतून भ्रमण करतील. प्लूटो अष्टमातील मकर राशीतून भ्रमण करेल. मिथुन राशीतून भ्रमण करणारा गुरू १ जूनला कर्क राशीत प्रवेश करेल.
गुरूचा हा राशी बदल आपणास हितकारक ठरेल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू सिंह राशीत प्रवेश करेल. गुरूचे हे सिंहस्थ स्थित्यंतरदेखील आपणासाठी पूरक ठरेल. २५ नोव्हेंबरला राहू वक्र गतीने भाग्यातील कुंभेतून अष्टमातील मकरेत प्रवेश करेल, तर केतू तृतीयातील सिंह राशीतून वक्र गतीने द्वितीयातील कर्क राशीत प्रवेश करेल.
मिथुन राशीचे मे महिन्याचे राशीभविष्य (Gemini Horoscope May 2026)
१ मेची बुद्ध पौर्णिमा बौद्धिक खुराक घेऊन येईल. आवडीच्या क्षेत्रात मन रमेल. निरर्थक चकाट्या पिटण्यापेक्षा बुद्धीला आव्हान देणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित व्हाल. विद्यार्थी वर्गाला बुध, गुरू आणि शुक्राचे पाठबळ उत्तम मिळेल. नव्या कल्पना विकसित कराल. सर्जनशीलतेला बढावा आणि प्रोत्साहन मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून अपेक्षित साहाय्य मिळाले नाही तरी खट्टू होऊ नका.
विवाहोत्सुक मुलं आपल्या जोडीदाराची निवड करतील. विवाह जुळतील. कौटुंबिक प्रश्न अतिशय हुशारीने सोडवाल. जमिनीचे व्यवहार लांबणीवर जातील. कोर्ट कचेरीच्या कामात हितशत्रू खो घालतील. मनस्ताप वाढेल. १७ मे पासून सुरू होणारा अधिक महिना नवे अनुभव घेऊन येईल. प्रवासाचा उत्साह कायम राहील. गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीवर बारीक लक्ष ठेऊन असतील. लाभ आणि तोटा यांचा समन्वय साधाल.
– ज्योतिषी सोनल चितळे
