Gajakesari Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु बृहस्पति यांना अत्यंत शुभ आणि प्रभावी ग्रह मानले जाते. हा ग्रह साधारणतः एका राशीत सुमारे एक वर्ष राहतो, मात्र या वर्षी गुरूंची गती थोडी वेगवान झाल्याने ते एकाच वर्षात दोन राशींमधून प्रवास करत आहेत. सध्या ते कर्क राशीत विराजमान आहेत आणि या राशीत ते ५ डिसेंबरपर्यंत थांबणार आहेत. त्यांच्या या उच्चस्थ स्थितीमुळे काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता ज्योतिषांनी व्यक्त केली आहे.

गुरू जेव्हा आपल्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत येतात, तेव्हा त्यांचा प्रभाव अधिक शुभ मानला जातो. वक्री अवस्थेत असूनही हा ग्रह अनेकांना अनुकूल परिणाम देऊ शकतो, असं ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. या काळात गुरू आणि चंद्र यांच्या युतीमुळे एक अत्यंत शक्तिशाली “गजकेसरी राजयोग” निर्माण होणार आहे. हा योग सुमारे ५४ तास टिकेल, पण त्याचा परिणाम अनेक दिवस राहू शकतो. या विशेष योगामुळे काही राशींना अचानक लाभ, कीर्ती, धनवृद्धी आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे.

१० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजून २ मिनिटांनी चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार असून १२ नोव्हेंबरपर्यंत ते त्याच राशीत राहतील. या काळात काही राशींच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात, असं ज्योतिषीय गणना सूचित करते.

मेष (Aries Zodiac)

या राशीत चतुर्थ भावात गजकेसरी राजयोग तयार होत आहे. या योगामुळे मेष राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ मिळू शकतो. काही काळापासून अडकलेली कामं अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये दीर्घकाळ अडथळे आले असतील तर त्यात सुधारणा होऊ शकते. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि पदोन्नतीची शक्यता वाढेल. व्यापारी वर्गालादेखील व्यवहारात नफा मिळू शकतो. काहींना मालमत्तेशी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. एकूणच हा आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधानाचा काळ असू शकतो.

कर्क (Cancer Zodiac)

या वेळेस गजकेसरी राजयोग थेट लग्नभावात तयार होत आहे. हीच ती स्थिती, जी जीवनात मोठी उलथापालथ घडवू शकते. गुरू आणि चंद्राची युती ही अत्यंत शुभ मानली जाते आणि त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना भाग्याची प्रबळ साथ मिळू शकते. नशीब तुमच्या बाजूने काम करेल आणि प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढू शकतो, तर काहींना घरात शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीच्या संधी मिळतील आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत यश लाभू शकते. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठीही हा काळ आशादायी ठरू शकतो.

तूळ (Libra Zodiac)

या राशीत दशम भावात गजकेसरी योग निर्माण होत आहे, जो करिअर आणि व्यवसायात प्रगती दर्शवतो. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते, तर नोकरी करणाऱ्यांना नवी जबाबदारी किंवा प्रमोशनची शक्यता आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल. लेखन, शिक्षण, मीडिया किंवा कम्युनिकेशन क्षेत्रातील लोकांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे.

सावधगिरीची सूचना:

या सर्व बदलांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार वेगळा असू शकतो, म्हणूनच या योगांना केवळ ज्योतिषशास्त्रीय शक्यता म्हणूनच पाहावं, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

१२ वर्षांनंतर कर्क राशीत तयार होत असलेला हा गजकेसरी राजयोग अनेकांसाठी नवीन सुरुवातीचा संकेत ठरू शकतो. काहींचं नशीब खरंच पुढच्या काही तासांत पलटी घेईल का हे पाहणं आता उत्सुकतेचं कारण ठरलं आहे!

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)