Navratri 2026: आदिमाया आदिशक्ती देवीचा नवरात्री उत्सव अगदी उद्यावर आला आहे. वर्षातले सर्वात महत्त्वाचे नऊ दिवस म्हणून शारदीय नवरात्रीची ओळख आहे. नवरात्रीत घटस्थापना केली जाते. त्याचप्रमाणे या ९ दिवसांत घरात अखंड दिवा लावण्याचीही प्रथा आहे. अखंड दिवा हा जे लोकं घट बसवतात ते देखील लावतात किंवा ज्यांच्याकडे घट नसतात ते देखील अखंड दिवा लावतात. अखंड दिवा म्हणजे, नऊ दिवस देवीजवळील दिवा शांत होऊ द्यायचा नसतो. अखंड दिवा प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे. याशिवाय पूजेची सुरुवात अपूर्ण मानली जाते. कलश स्थापनेनंतर पहिल्या दिवशी अखंड दिवा प्रज्वलित करावा. नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण ९ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावली जाते. कारण अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते.

नवरात्रात अखंड दिवा का लावला जातो?

आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून २ वेळा देवीची उपासना करतो. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक घट-स्थापना, अखंड दिवा, जागरण इत्यादी करतात. नवरात्रीच्या ९ दिवसात आपण घरात घट स्थापना आणि अखंड दिवा लावतो. या अखंड दिव्याला न विझू देता तेवण्याचा नियम आहे. हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे नाही. जर का हा दिवा विझला तर हे वाईट मानले आहे.

नवरात्रातील ९ दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात. नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यानं घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं संरक्षण करावं.

अखंड दिवा लावण्याची पद्धत

नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत, त्यामुळे आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात. सहसा लोकं पितळ्याचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवतात. जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता. मातीच्या दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून वाळवून घ्या.

अखंड दिवा लावण्यापूर्वी मनात संकल्प करावा आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना देवीआईजवळ करावी. तर मग जाणून घेऊया

अखंड दिवा लावण्याचे नियम

  • अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये. चौरंग किंवा पाटावर ठेवावा. जर तुम्ही देवीसमोर दिवा लावत असाल तर त्याखाली आसन ठेवा किंवा अष्टदल कमळ ठेवा.
  • अखंड दिव्याची वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते. सव्वा हाताचा मापाचं हे रक्षासूत्र असते. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात मध्यभागी ठेवतात.
  • अखंड दिवा लावण्यासाठी तुपाचा, तीळाचं तेल किंवा मोहरीचं तेल याचा वापर करावा.
  • अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा, पण दिवा तेलाचा असेल तर डाव्या बाजूस ठेवावा.
  • ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा ह्याला देवी देवांचे स्थान मानतात. म्हणून अखंड दिवा पूर्व- दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वी कडे किंवा उत्तरेकडे असावं.

अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात.

९ दिवस झाल्यावर अखंड दिवा फुंकर मारून विझवू नये, तो आपोआप शांत होऊ द्या.

अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणावं –
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।।