Numerology Mulank Personality : अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेचा त्याच्या व्यक्तिमत्त्व आणि जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. त्याच्या आधारावर त्याचा मूलांक निश्चित केला जातो, जो त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, विचार आणि वर्तन याबद्दल मार्गदर्शन करतो. आज आपण ८ या मूलांक असलेल्या लोकांच्या स्वभावाविषयी जाणून घेऊ. त्यांना अनेकदा ‘पाषाणहृदयी’ म्हटले जाते; परंतु हेच लोक त्यांच्या कठोर परिश्रम आणि शिस्तीतून मोठे यश मिळवतात.
मूलांक ८ आणि शनीचा प्रभाव
कोणत्याही महिन्याच्या ८, १७ व २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. अंकशास्त्रानुसार हा मूलांक शनी ग्रहाच्या प्रभावाशी संबंधित आहे. शनीच्या प्रभावामुळे हे लोक शिस्तप्रिय, न्यायप्रिय आणि नियमांचे पालन करणारे असतात.
स्वभावाने गंभीर आणि कडक
मूलांक ८ असलेले लोक स्वभावाने खूप गंभीर असतात. त्यांना योग्य आणि अयोग्य यांतील फरक स्पष्टपणे कळतो. त्यामुळे ते कधीही चुकीच्या, वाईट गोष्टीला पाठिंबा देत नाहीत. त्यामुळेच लोक त्यांना कधी कधी कठोर किंवा अगदी पाषाणहृदयी म्हणतात. त्यांना शिस्त आणि नियमांनुसार जगायला आवडते, रोजच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा गोंधळ त्यांना आवडत नाही.
राग आणि अहंकार
या मूलांकाचे लोक कोणत्याही गोष्टींवर पटकन रागावतात. कधी कधी त्यांना इतका राग येतो की, त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. त्यांना स्वतःचे निर्णय स्वत: घ्यायला आवडते. इतरांचा सल्ला ते नेहमीच ते ऐकत नाहीत. ते स्वतःच्या विचारानुसार वागणे पसंत करतात.
संघर्षमय पण यशस्वी जीवन
मूलांक ८ असलेल्या व्यक्तींचे आयुष्य अनेकदा संघर्षमय असते. त्यांच्या मार्गात वारंवार अडचणी येतात; पण ते कधीही हार मानत नाहीत. कठोर मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर ते प्रत्येक आव्हानाचा सामना करतात आणि अखेरीस यश मिळवतात.
भावनांवर ठेवतात नियंत्रण
मूलांक ८ असलेले लोक भावनांच्या आहारी सहसा जात नाहीत. त्यांना इतरांच्या प्रभावाखाली जगायला आवडत नाही. मात्र, ते आपल्या जवळच्या व्यक्तींप्रति अत्यंत निष्ठावान आणि समर्पित असतात. ते आपल्या प्रियजनांच्या मदत आणि हितासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात.
आत्मविश्वासू
मूलांक ८ असलेल्या व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणात आत्मविश्वासू असतात. त्यामुळेच ते आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवतात आणि पुढे वाटचाल करतात. त्यांना त्यांच्या कामात कोणी हस्तक्षेप केलेला आवडत नाही आणि त्यांना आपल्या मनाप्रमाणे जीवन जगायला आवडते. कठोर मेहनत, प्रामाणिकपणा आणि कणखरपणा हे गुण त्यांना यशाच्या उच्च शिखरावर पोहोचण्यास मदत करतात.
(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
