Numerology and girls’ personality : अनेकदा आपण आपल्या आजूबाजूला अशा मुलींना पाहतो, ज्या प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. कोणी संकटात असो, गोंधळलेले असो किंवा खचून जाण्याच्या मार्गावर असो, या मुली क्षणाचाही विचार न करता प्रत्येकाच्या पाठीशी उभ्या राहतात. मग ते कुटुंब असो, मित्रमैत्रिणी असोत किंवा ऑफिसमधील सहकारी असोत, त्या नेहमीच पुढाकार घेतात; मात्र, एक आश्चर्यकारक वळण तेव्हा येते, जेव्हा याच मुली स्वतः अडचणींचा सामना करतात. अचानक त्यांच्या पाठीशी उभे राहणारे लोक कमी होऊ लागतात. अशा मुली बाहेरून जरी कणखर दिसत असल्या, तरी त्यांच्या मनात खोलवर एकटेपणाची भावना दडलेली असते. पण प्रश्न हा आहे की, ज्या मुली इतरांना आधार देतात त्यांना साथ द्यायला कोणीच का उरत नाही? हा केवळ नशिबाचा खेळ आहे, की यामागे काही खोलवर दडलेले कारण आहे?

अंकशास्त्रानुसार, जन्मतारीख हा केवळ एक अंक नाही; ती व्यक्तीचा मूळ स्वभाव, मानसिकता आणि जीवनशैली दर्शवते. विशेषतः, कोणत्याही महिन्याच्या १, १० आणि १९ तारखेला जन्मलेल्या मुलींमध्ये काही विशिष्ट गुणधर्म दिसून येतात. या मुलींमध्ये मन अत्यंत निर्मळ, प्रबळ दृढनिश्चय आणि निस्वार्थ वृत्ती असते. त्या आपले जीवन इतरांच्या भल्यासाठी जगतात. मूलांक १ असलेल्या या मुलींचे खरा स्वभाव कसा असतो. त्या सर्वांना आधार देतात आणि अखेरीस, त्यांच्या स्वतःच्या संकटाच्या काळात त्या पूर्णपणे एकट्या का पडतात?

१, १० १९ आणि२८ तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या १, १० १९ आणि२८ तारखेला जन्मलेल्या मुलींना १ हा मूलांक असतो. या मूलांकाचा अधिपती ग्रह सूर्य आहे. सूर्याला ऊर्जा, आंतरिक शक्ती, नेतृत्व आणि तेजाचे प्रतीक मानले जाते. परिणामी, मूलांक १ असलेल्या मुलींमध्ये एक अद्वितीय तेज आणि आत्मविश्वास असतो. त्या जिथे कुठे जातात, तिथे त्या एक वेगळा ठसा उमटवतात आणि केवळ त्यांच्या उपस्थितीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात.

मूलांक १ असलेल्या मुलींचा स्वभाव

मूलांक १ असलेल्या मुली स्वभावाने दृढनिश्चयी आणि स्वावलंबी असतात. त्यांना कोणावरही जास्त अवलंबून राहणे आवडत नाही. त्या स्वतःचे निर्णय घेणे पसंत करतात आणि स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःचा मार्ग तयार करण्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच नेतृत्वाची नैसर्गिक भावना दिसून येते. शाळेत असो वा घरी, त्या अनेकदा पुढाकार घेणे पसंत करतात. कधीकधी, हाच आत्मविश्वास इतरांना हट्टीपणा किंवा अहंकार वाटू शकतो; पण, प्रत्यक्षात, त्यांचा स्वतःवर गाढ विश्वास असतो.

ज्या इतरांच्या जबाबदाऱ्या उचलतात

मूलांक १ असलेल्या मुलींचे हृदय निरागस असते. इतरांना मदत करण्यात त्यांना एक मानसिक समाधान मिळते. मित्र-मैत्रिण अडचणीत असो किंवा कौटुंबिक समस्या सोडवायची असो, त्या नेहमीच सर्वात आधी पुढे येतात. अनेकदा असे घडते की, लोक आपल्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवतात, कारण त्यांना चांगलेच ठाऊक असते की, या मुली नकार देणार नाहीत. त्या कितीही थकल्या तरी त्या प्रत्येकाची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात.

स्वतःच्या समस्या एकट्याने हाताळणे

या मुलींचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्या आपल्या वैयक्तिक समस्या इतरांना क्वचितच सांगतात. त्यांचा असा विश्वास असतो की, जर त्यांनी बाहेरून खंबीरपणा दाखवला, तर कालांतराने सर्व काही ठीक होईल. परिणामी, जेव्हा त्यांना खरोखरच आधाराची गरज असते, तेव्हा त्या आतून किती खचलेल्या आहेत हे इतरांच्या लक्षातच येत नाही. बाहेरून त्या आनंदी आणि हसऱ्या दिसत असल्या तरी, या मुली अनेकदा आतून खूप वेदना आणि संघर्ष सहन करत असतात.

संकटाच्या वेळी त्या एकट्या का पडतात?

मूलांक १ असलेल्या मुली अनेकदा स्वतःला एकाकी का समजतात याचे मुख्य कारण म्हणजे, लोक नेहमीच असे गृहीत धरतात की,”त्या खंबीर आणि स्वयंपूर्ण आहेत. प्रत्येकाला वाटते की त्यांना कोणाच्याही मदतीची गरज नाही. दुसरीकडे, त्या स्वतः मदत मागण्यास कचरतात; त्यांना भीती वाटते की, इतरांकडून आधार घेतल्याने त्यांची प्रतिमा डागाळेल किंवा त्या कमकुवत दिसतील. या चक्रात अडकून, त्या प्रत्येक लढाई पूर्णपणे एकट्यानेच लढतात.

हार मानणे त्यांच्या स्वभावात नाही

परिस्थिती कितीही कठीण असली तरी, मूलांक १ असलेल्या मुली कधीही हार मानत नाहीत. त्यांच्यात पडण्याची आणि पुन्हा उठण्याची लवचिकता असते. हाच दृढनिश्चय आणि धैर्य त्यांना पुढे घेऊन जाते. अनेकदा, त्यांना दृढ विश्वास असतो की, कोणी त्यांच्या पाठीशी उभे राहो वा न राहो. त्या सर्व काही पूर्णपणे स्वतःच्या बळावर हाताळण्यास सक्षम आहेत. हीच मानसिकता त्यांना सामर्थ्यवान आणि एकाकी दोन्ही बनवते.

आयुष्यात यश आणि आदर

या मुली आयुष्यात यश आणि आदर मिळवण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात. जरी यश आणि आदर त्यांना उशिरा मिळाले तरी ते मिळणार ते निश्चित असते. त्या पूर्णपणे स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचे नाव कमावतात. त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात, त्यांना आदर मिळतो आणि लोक त्यांच्या क्षमतांना मान्यता देतात.

या मुलींसाठी एक महत्त्वाचा धडा

मूलांक १ असेल्या मुलींनी हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे की, कणखर असणे चुकीचे नाही, पण प्रत्येक वेळी एकट्याने लढणे योग्य नाही. कधीकधी आपल्या भावना व्यक्त केल्यास, लोकांना तुमचे दुःख समजेल.