Numerology : अंकशास्त्रानुसार, प्रत्येक जन्मतारखेचा संबंध एका विशिष्ट मूलांकाशी आणि ग्रहाशी असतो. याच्याच आधारे संबंधित व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व ठरते. अंकशास्त्र सांगते की, काही मूलांकांचे लोक मैत्रीच्या बाबतीत खूपच भारी असतात. मूलांक आणि त्यांचा स्वामी ग्रह यावरून तुम्ही त्यांच्याबद्दल जाणून घेऊ शकता. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म २५ तारखेला झाला असेल, तर त्याचा मूलांक २ अधिक ५ म्हणजेच ७ असेल. आज आपण अशा काही मूलांकांच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे मैत्रीच्या बाबतीत खूपच चांगले मानले जातात. हे लोक मैत्रीचे नाते मनापासून जपतात.
मैत्रीत प्रामाणिक असतात मूलांक २ चे लोक
कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. या लोकांचा स्वामी ग्रह ‘चंद्र’ आहे. चंद्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक स्वभावाने खूप मऊ आणि चांगले असतात. हे लोक अत्यंत केअरिंग (काळजी घेणारे) असतात. ते उत्तम मित्र म्हणून सिद्ध होतात. मूलांक २ चे लोक मैत्रीत खूप प्रामाणिक असतात, परंतु बदल्यात त्यांनाही मित्राकडून प्रामाणिकपणाचीच अपेक्षा असते. मैत्रीत झालेली फसवणूक हे लोक कधीच सहन करू शकत नाहीत.
मित्रांची साथ कधीच सोडत नाहीत मूलांक ४ चे लोक
अंकशास्त्रानुसार, ज्यांची जन्मतारीख ४, १३, २२ आणि ३१ असते, त्यांचा मूलांक ४ असतो. या लोकांचा स्वामी ग्रह ‘राहू’ आहे. राहू ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक इतरांपेक्षा वेगळा विचार करतात. ते आनंदी स्वभावाचे असतात. या लोकांचे मित्र सहसा कमी असतात, मात्र ज्यांच्याशी यांची मैत्री होते, ती खूप घट्ट आणि दर्जेदार असते.
मूलांक ५ चे लोक बनतात सर्वोत्तम मित्र
कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. या लोकांचा संबंध ‘बुध’ ग्रहाशी असतो. मूलांक ५ चा स्वामी ग्रह बुध आहे. हे लोक अत्यंत बुद्धिमान असतात. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि विनोदी असतो. यांच्याकडे संवाद साधण्याची उत्तम कला (Communication Skills) असते. हे लोक खूप लवकर मित्र बनवतात आणि समोरील व्यक्तीमध्ये सहज मिसळून जातात. मित्रांना मदत करण्यासाठी हे लोक नेहमीच पुढे असतात.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
