Numerology Mulank Prediction : हल्ली लोक अगदी लहान-सहान गोष्टींवरून नाराज होतात, कठीण परिस्थितीत काय करावे ते न सुचल्यामुळे ते हताश होतात आणि फक्त चिंता करण्यात वेळ वाया घालवतात. पण, अंकशास्त्रात अशा एका मूलांकाचा उल्लेख आहे, ज्याचे लोक कोणत्याही परिस्थितीत शांत आणि संयमी असतात. त्यांना आयुष्य आनंदाने जगायला आवडते. हा मूलांक म्हणजे ७, या मूलांकाचे लोक कोणतीही गोष्ट मनाला लावून घेत नाहीत. अंकशास्त्रानुसार, या मूलांकाचे लोक खूप शांत आणि संयमी असतात. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघतात. कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ७ असतो.

थोडे शांत आणि थोडे रहस्यमय

७ मूलाकांचा स्वामी ग्रह केतू असतो, म्हणूनच हे लोक शांत दिसतात; पण त्यांचा स्वभाव गूढ असतो. त्यांच्या मनात काय चालले आहे हे समजणे कठीण असते. केतूच्या प्रभावामुळे त्यांची अंतर्ज्ञानशक्ती खूप प्रबळ असते.

जोखीम पत्करण्यास न घाबरणारे

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक ७ असतो, ते काहीतरी नवीन करण्यास घाबरत नाहीत, आव्हाने सहजपणे स्वीकारतात. त्यांच्यामध्ये शिकण्याची उपजत क्षमता असते आणि म्हणूनच ते वेळोवेळी बदलांना स्वीकारतात.

तणावापासून दूर

ज्या लोकांचा मूलांक ७ असतो, त्यांच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत घाबरून ताण न घेण्याचा आणि परिस्थिताला सामोरे जाण्याचा गुण असतो. हे लोक आनंदी राहण्यावर आणि आनंदाने जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात.

मूलांक ७ असलेले लोक जीवनात संतुलन राखण्यात खूप चांगले असतात. त्यांचे व्यावसायिक जीवन असो वा वैयक्तिक आयुष्य, ते आयुष्यभर संतुलन राखतात आणि हा गुण त्यांना मन शांत ठेवण्यास मदत करतो.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)