Mulank Compatibility by Date of Birth: प्रेम आणि नातेसंबंधांबाबत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो. आपल्यासाठी योग्य जोडीदार कोण? काही नाती सहज जुळतात, तर काहींमध्ये सतत तणाव निर्माण होतो. पण जर तुमच्या जन्मतारखेनेच या प्रश्नाचं उत्तर दिलं तर? अंकशास्त्रानुसार, तुमचा ‘मूलांक’ तुमच्या स्वभावासोबतच तुमच्यासाठी योग्य जोडीदार कोण असू शकतो याबाबतही संकेत देतो.
अंकशास्त्रात ‘मूलांक’ म्हणजे जन्मतारखेच्या आकड्यांची बेरीज. उदाहरणार्थ- २८ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक २+८ = १० म्हणजेच १+० = १ होतो. या मूलांकावरून तुमच्या आयुष्यात कोणत्या मूलांकाच्या व्यक्तीसोबत तुमची चांगली केमिस्ट्री जुळू शकते, याचा अंदाज वर्तवला जातो. चला, जाणून घेऊया कोणत्या मूलांकासाठी कोणता जोडीदार अनुकूल ठरू शकतो…
मूलांक १ (१, १०, १९, २८)
मूलांक १ असलेल्या व्यक्ती आत्मविश्वासू आणि नेतृत्वगुण असलेल्या असतात. अशा व्यक्तींना मूलांक २, ३, ४ किंवा ९ असलेले जोडीदार समजून घेणारे आणि साथ देणारे ठरू शकतात. या दोघांच्या नात्यामध्ये समतोल आणि प्रगतीची शक्यता दिसून येते.
मूलांक २ (२, ११, २०, २९)
संवेदनशील आणि भावनिक स्वभावामुळे मूलांक २ असलेल्यांना प्रेमळ नात्यांची गरज असते. मूलांक १, ७ किंवा ३ असलेल्या व्यक्तींशी त्यांची जोडी चांगली जुळू शकते. या नात्यामध्ये भावनिक समजूतदारपणा वाढण्याची शक्यता असते.
मूलांक ३ (३, १२, २१, ३०)
सर्जनशील आणि सकारात्मक विचारसरणी असलेल्या मूलांक ३ साठी मूलांक १, २, ५ किंवा ७ असलेले जोडीदार प्रेरणादायी ठरू शकतात. या नात्यांमध्ये संवाद आणि उत्साह टिकून राहण्याची शक्यता असते.
मूलांक ४ (४, १३, २२, ३१)
स्थिर आणि व्यवहारिक स्वभावाच्या व्यक्तींसाठी मूलांक १, २ किंवा ९ असलेले जोडीदार योग्य ठरू शकतात. या नात्यांमध्ये स्थैर्य आणि दीर्घकालीन बांधिलकी दिसू शकते.
मूलांक ५ (५, १४, २३)
मुक्त स्वभाव आणि साहसी वृत्ती असलेल्या मूलांक ५ साठी मूलांक १, ३, ६, ७ किंवा ८ असलेले जोडीदार चांगले ठरू शकतात. या नात्यांमध्ये रोमांच आणि नवे अनुभव मिळण्याची शक्यता असते.
मूलांक ६ (६, १५, २४)
प्रेमळ आणि कुटुंबकेंद्री असलेल्या मूलांक ६ साठी मूलांक ३, ४, ५ किंवा ६ असलेले जोडीदार स्थिर नातं निर्माण करू शकतात. या नात्यांमध्ये प्रेम आणि समर्पण वाढण्याची शक्यता असते.
मूलांक ७ (७, १६, २५)
गंभीर आणि विचारशील स्वभावाच्या व्यक्तींना मूलांक २, ३, ५ किंवा ८ असलेले जोडीदार योग्य ठरू शकतात. या नात्यांमध्ये परस्पर समज आणि मानसिक जुळवाजुळव होण्याची शक्यता असते.
मूलांक ८ (८, १७, २६)
प्रयत्नशील आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तींसाठी मूलांक २, ४, ७ किंवा ९ असलेले जोडीदार पूरक ठरू शकतात. या नात्यांमध्ये आर्थिक आणि व्यावहारिक प्रगतीची शक्यता दिसते.
मूलांक ९ (९, १८, २७)
ऊर्जावान आणि उत्साही स्वभावाच्या व्यक्तींना मूलांक २, ३, ६ किंवा ८ असलेले जोडीदार चांगले साथ देऊ शकतात. या नात्यांमध्ये उत्कटता आणि भावनिक जवळीक वाढण्याची शक्यता असते.
महत्त्वाची सूचना
ही माहिती अंकशास्त्रावर आधारित शक्यता दर्शवते. प्रत्यक्ष आयुष्यात नातेसंबंध अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे या माहितीला अंतिम सत्य मानू नये.
