Numerology Mulank Who Get Success After 35: अनेकांना आयुष्यात यश मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. काही जणांना कमी वयातच मोठं यश मिळतं, तर काहींच्या आयुष्यात यशाची खरी सुरुवात वयाच्या ३५ वर्षांनंतर होते, असं अंकशास्त्र सांगतं. विशेषतः काही ठरावीक जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात या वयानंतर मोठे बदल घडून येतात, अशी मान्यता आहे. करिअर, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा अशा अनेक बाबतींत त्यांची प्रगती होते. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या काळात कितीही अडचणी आल्या तरी अनुभव, मेहनत आणि संयमाच्या जोरावर या व्यक्ती यशाचं शिखर गाठतात, असं अंकशास्त्रात सांगितलं जातं. तर मग जाणून घेऊया, कोणत्या जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्तींचं नशीब वयाच्या ३५ वर्षांनंतर उजळतं
मूलांक ३ : वयाच्या ३५ नंतर मिळते प्रतिभेला खरी ओळख
कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ३ असतो. अंकशास्त्रानुसार, या मूलांकाचा स्वामी ग्रह गुरू आहे. गुरूला देवतांचा गुरू आणि ज्ञान, बुद्धिमत्ता व समृद्धीचा कारक मानलं जातं.
मूलांक ३ असलेल्या व्यक्ती सर्जनशील, कल्पक आणि आत्मविश्वासू असतात. स्वतःमधील कौशल्य जगासमोर मांडण्याची त्यांची इच्छा असते. मात्र, त्यांना अपेक्षित यश लगेच मिळेलच असं नाही. अनेकदा सुरुवातीच्या काळात त्यांना संघर्ष करावा लागतो. वेगवेगळे अनुभव घेतल्यानंतर त्यांच्यात अधिक परिपक्वता येते. वयाच्या ३५ वर्षांनंतर त्यांच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळतं आणि करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होतात, अशी ज्योतिषशास्त्रीय मान्यता आहे.
मूलांक ४ : संघर्षातून उभं करतात स्वतःचं वेगळं स्थान
कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ४ असतो. या मूलांकाचा स्वामी छाया ग्रह राहू मानला जातो. मूलांक ४ असलेल्या व्यक्तींची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते. संशोधन, नवीन गोष्टी शिकणं, वेगळ्या कल्पना मांडणं आणि प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करणं त्यांना आवडतं. मात्र, आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना अनेकदा संभ्रम आणि अडचणींचा सामना करावा लागतो.
अंकशास्त्रानुसार, वयाच्या ३५ वर्षांनंतर या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतात. अनुभवाच्या जोरावर त्या योग्य निर्णय घेऊ लागतात. करिअर आणि व्यवसायात स्थिरता मिळवण्याबरोबरच समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यातही त्या यशस्वी होतात.
मूलांक ८ : शनिदेवांच्या कृपेने मेहनतीचं मिळतं फळ
कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ८ असतो. या मूलांकाचा स्वामी न्याय आणि कर्माचं फळ देणारा शनिदेव मानला जातो. मूलांक ८ असलेल्या व्यक्ती मेहनती, शिस्तप्रिय आणि संयमी असतात. आयुष्यात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही, त्यामुळे त्यांना प्रत्येक यशासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र, त्यांच्यातून शिकण्याची आणि कठीण परिस्थितीतही खंबीर राहण्याची क्षमता असते.
अंकशास्त्रानुसार, या व्यक्तींना सुरुवातीच्या काळात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. मात्र, वयाच्या ३५ वर्षांनंतर त्यांच्या मेहनतीला योग्य दिशा मिळते. करिअरमध्ये मोठ्या संधी मिळण्यासोबतच आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते. स्वतःच्या कर्तृत्वावर त्या समाजात मानाचं स्थान निर्माण करतात, अशी मान्यता आहे.
मूलांक ९ : धाडस आणि जिद्दीच्या जोरावर मिळवतात मोठं यश
कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ९ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रहांचा सेनापती मंगळ मानला जातो. मंगळाच्या प्रभावामुळे या व्यक्ती धाडसी, साहसी आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाच्या असतात. कोणतंही आव्हान स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. मात्र, सुरुवातीच्या काळात त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कधी राग, घाईने घेतलेले निर्णय किंवा संघर्ष करण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होऊ शकतात.
अंकशास्त्रानुसार, वयाच्या ३५ वर्षांनंतर या व्यक्तींना अनुभवाचा फायदा मिळू लागतो. आत्मविश्वास आणि योग्य निर्णयक्षमता यांच्या जोरावर त्या करिअरमध्ये मोठी झेप घेऊ शकतात. नेतृत्व करण्याची संधी, आर्थिक प्रगती आणि समाजात प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असल्याचं मानलं जातं.
