Lucky Numerology Numbers for Wealth: तुमच्या जन्मतारखेत दडलेला एखादा अंक तुमच्या व्यक्तिमत्त्वासोबतच आर्थिक बाबींवरही प्रभाव टाकतो, असं अंकशास्त्रात मानलं जातं. काही मूलांक असे आहेत ज्यांच्याकडे पैसा, संधी आणि यश चुंबकाप्रमाणे आकर्षित होतं. त्यामुळे या लोकांना आयुष्यात अचानक आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे ते मोठी संपत्ती उभी करू शकतात.
अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेच्या आधारे मिळणारा मूलांक व्यक्तीच्या स्वभावातील काही महत्त्वाचे पैलू दर्शवतो. त्यात नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संवादकौशल्य, मेहनत आणि आर्थिक दृष्टिकोन यांचा समावेश होतो. त्यामुळे काही मूलांकांना ‘Money Magnet’ किंवा धन आकर्षित करणारे अंक असं म्हटलं जातं. मात्र, हे लक्षात घ्या की अंकशास्त्र हे श्रद्धेवर आधारित शास्त्र आहे. आर्थिक यशाची हमी देणारे वैज्ञानिक प्रमाण नाही. तर मग जाणून घेऊया कोणते मूलांक धनवान होण्याच्या बाबतीत विशेष मानले जातात…
मूलांक १: नेतृत्वगुणातून मिळतं मोठं यश
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ मानला जातो. अंकशास्त्रात या अंकाला नेतृत्व आणि आत्मविश्वासाचं प्रतीक मानलं जातं. या मूलांकाचे लोक धाडसी, महत्त्वाकांक्षी आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणारे असल्याचं मानलं जातं. कोणताही निर्णय घेताना ते जास्त काळ संभ्रमात राहत नाहीत. त्यामुळे व्यवसाय किंवा करिअरमध्ये जोखीम पत्करून मोठी संधी मिळवण्याची क्षमता त्यांच्यात असते.
अंकशास्त्रीय मान्यतेनुसार, मूलांक १ असलेल्या व्यक्तींना अचानक आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात. त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि मोठं नेटवर्क भविष्यात आर्थिक प्रगतीसाठी फायदेशीर ठरू शकतं.
मूलांक ५ : बुद्धी आणि संवादातून पैसा कमावतात
५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ५ असतो. अंकशास्त्रात या अंकाचा संबंध बुधाशी जोडला जातो. मूलांक ५ असलेले लोक हुशार, चतुर, बोलके आणि परिस्थितीनुसार निर्णय घेणारे असल्याचं मानलं जातं. विशेषतः व्यवसाय, मार्केटिंग, सेल्स, मीडिया, कम्युनिकेशन किंवा ट्रेडिंगसारख्या क्षेत्रात ते चांगली कामगिरी करू शकतात. यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता. त्यामुळे नवीन संधी ओळखून त्याचा फायदा घेण्यात हे लोक पुढे असतात, अशी अंकशास्त्रीय धारणा आहे. ‘रिस्क घ्या आणि संधीचं सोनं करा’ हा मूलांक ५ च्या व्यक्तींच्या स्वभावाला लागू होतो, असं अंकशास्त्रात मानलं जातं. योग्य नियोजन आणि मेहनतीची जोड मिळाल्यास हे लोक मोठी आर्थिक उंची गाठू शकतात.
मूलांक ६ : सुख-सुविधा आणि ऐश्वर्याकडे ओढ
६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ६ असतो. या अंकाचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडला जातो. मूलांक ६ असलेल्या व्यक्तींना सुंदर आणि आरामदायी जीवनाची आवड असते. चांगलं घर, महागड्या वस्तू, प्रवास, फॅशन आणि सुख-सुविधा यांचं त्यांना आकर्षण असल्याचं मानलं जातं. मात्र, फक्त ऐषआरामाची इच्छा असून उपयोग नाही. हे लोक आपल्या ध्येयासाठी मेहनत करण्याची क्षमता ठेवतात, असं अंकशास्त्र सांगतं. त्यामुळे कष्ट + योग्य संधी + आर्थिक नियोजन यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. अंकशास्त्रानुसर, मूलांक ६ असलेल्या काही व्यक्तींना पैतृक संपत्ती, गुंतवणूक किंवा इतर माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे या मूलांकाला समृद्धी आणि ऐश्वर्याशी जोडून पाहिलं जातं.
