Numerology : अंकशास्त्रात विशिष्ट मूलांकांशी संबंधित महिला जर सासू आणि सून म्हणून एकाच घरात आल्या, तर त्यांच्यात ‘३६ चा आकडा’ असण्याची शक्यता दाट असते. या मूलांकांच्या व्यक्तींना एकमेकांसोबत जुळवून घेणे नेहमीच आव्हानात्मक ठरते. तसेच, विचारांमधील मतभेदांमुळे त्यांच्या नात्यात किंवा भागीदारीत समन्वयाची मोठी कमतरता भासू शकते. चला तर मग जाणून घेऊया या मूलांकांबद्दल.
यांच्यात कधीच पटत नाही
अंकशास्त्रानुसार, मूलांक १ आणि मूलांक ८ असलेल्या सासू-सुनेमध्ये विचारांच्या देवाणघेवाणीत अडथळे येत असल्याने, त्यांचे एकमेकींशी अजिबात पटत नाही. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ मानला जातो. या मूलांकाचा स्वामी ग्रह ‘सूर्य’ आहे. दुसरीकडे, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ८ मानला जातो. मूलांक ८ चा स्वामी ‘शनी’ आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनी हे एकमेकांचे परम शत्रू मानले जातात. या दोन्ही मूलांकांच्या व्यक्ती स्वभावाने हट्टी आणि नेतृत्वगुण असणाऱ्या असतात. दोघींनाही स्वतःचे म्हणणे खरे करण्याची सवय असते. याच कारणामुळे जर सासू आणि सून मूलांक १ आणि ८ च्या असतील, तर त्यांच्यात ताळमेळ बसवणे थोडे कठीण जाते.
मूलांक ३ आणि मूलांक ६
मूलांक ३ आणि मूलांक ६ असलेल्या सासू-सुनेमध्येही मोठ्या प्रमाणावर वैचारिक मतभेद असू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे मूलांक ३ (जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३०) चा स्वामी ग्रह ‘गुरु’ असतो आणि मूलांक ६ (जन्मतारीख ६, १५ किंवा २४) चा स्वामी ‘शुक्र’ असतो. हे दोन्ही ग्रह एकमेकांचे नैसर्गिक शत्रू आहेत. अशा परिस्थितीत, मूलांक ३ आणि ६ च्या सासू-सुनेमध्ये स्वभाव आणि विचारसरणीतील भिन्नतेमुळे वाद होणे स्वाभाविक आहे.
मूलांक ३ च्या व्यक्तींना शिस्त, ज्ञान आणि साधेपणा आवडतो, तर मूलांक ६ च्या व्यक्ती विलासिता, सौंदर्य आणि झगमगाटाकडे अधिक आकर्षित होतात. विचारसरणीतील या मोठ्या फरकामुळे त्यांच्यात अनेकदा संघर्षाची परिस्थिती निर्माण होते.
नेहमी निर्माण होते वादाची परिस्थिती
मूलांक ४ म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झाला आहे, त्यांचा संबंध ‘राहु’ ग्रहाशी असतो. तर मूलांक ९ च्या व्यक्तींवर म्हणजेच ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या लोकांवर ‘मंगळ’ ग्रहाचा प्रभाव असतो. या दोन्ही मूलांकांच्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत उग्र आणि एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन ठेवणाऱ्या असतात. याच कारणामुळे या मूलांकांच्या सासू-सुनेला एकमेकांसोबत सामंजस्याने राहण्यात अडचणींचा सामना करावा लागतो.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
