Simple Living Numerology : अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेवरून व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि राहणीमानाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. काही लोकांना आपल्या यश आणि कर्तृत्वाचे प्रदर्शन करायला आवडते, तर काहींसाठी मानसिक शांतता आणि खाजगी आयुष्य जास्त महत्त्वाचे असते. अंकशास्त्रानुसार, मूलांक २, ४ आणि ७ चे लोक सामान्यतः दिखाव्यापासून दूर राहणे पसंत करतात.
मूलांक २ चे लोक असतात शांत स्वभावाचे
कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. अंकशास्त्रात या अंकाचा संबंध चंद्राशी मानला जातो. या मूलांकाचे लोक शांत, संवेदनशील आणि मन मिळावू मानले जातात. त्यांना प्रत्येक गोष्टीचा गाजावाजा करायला आवडत नाही. आपल्या यशाची इतरांसमोर दवंडी पिटण्याऐवजी हे लोक शांतपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतात. यांच्यासाठी महागड्या वस्तूंपेक्षा नात्यांमधील गोडवा आणि मनाची शांती जास्त मोलाची असते.
नात्यांना देतात जास्त महत्त्व
मूलांक २ च्या लोकांसाठी उत्तम नातेसंबंध हा आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो. ते समोरच्या व्यक्तीशी प्रेमाने आणि आदराने वागणे पसंत करतात. महागड्या वस्तू किंवा मोठ्या यशाने इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे ही यांची प्राथमिकता नसते. आपला आनंदसुद्धा ते सर्वांसमोर लगेच दाखवत नाहीत. शांत वातावरणात आपल्या माणसांसह वेळ घालवणे त्यांना जास्त आवडते. अंकशास्त्रानुसार, हाच साधेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खास बनवतो.
मूलांक ४ च्या लोकांचा कामावर असतो विश्वास
कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो. अंकशास्त्रात या अंकाचा संबंध राहू ग्रहाशी जोडला गेला आहे. मूलांक ४ चे लोक व्यावहारिक, कष्टाळू आणि कामाप्रती गंभीर मानले जातात. यशाबद्दल जास्त गप्पा मारण्याऐवजी हे लोक परिणामावर लक्ष केंद्रित करतात. मेहनत करणे आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे यांच्यासाठी महत्त्वाचे असते, म्हणूनच त्यांना दिखाव्यापासून दूर राहायला आवडते.
यश मिळूनही साधेपणा पसंत
मूलांक ४ च्या लोकांना पैसा आणि यश मिळाल्यानंतरही अवाजवी खर्च करायला आवडत नाही. केवळ इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करणे ही यांची सवय नसते. ते गरजेनुसारच खर्च करण्याचा प्रयत्न करतात. चांगले कपडे किंवा सुविधा आवडत असल्या तरी लोकांचे लक्ष वेधून घेणे हा त्यांचा उद्देश नसतो. अंकशास्त्रानुसार, काम आणि यशाबाबत त्यांचा दृष्टिकोन खूप व्यावहारिक असतो.
मूलांक ७ च्या लोकांना हवी असते शांतता
कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो. अंकशास्त्रात या अंकाचा संबंध केतू ग्रहाशी मानला गेला आहे. मूलांक ७ चे लोक सखोल विचार करणारे आणि आत्मचिंतन करणारे असतात. त्यांना खूप गर्दी आणि भपकेबाजपणा आवडत नाही. शांत ठिकाणी आपल्या विचारांसह वेळ घालवणे त्यांना आवडते. आपले खाजगी आयुष्य इतरांच्या नजरेपासून दूर ठेवणे ते पसंत करतात.
दिखाव्यापेक्षा सत्याची साथ
मूलांक ७ च्या लोकांसाठी नात्यांमधील सत्यता आणि भावनांचे महत्त्व जास्त असते. फक्त दाखवण्यासाठी नाते जपण्याऐवजी ते मनापासून जोडण्याला महत्त्व देतात. आपल्या यशाची जाहिरात करणे त्यांना आवडत नाही. अनेकदा ते यशस्वी झाल्याचे त्यांच्या आसपासच्या लोकांना खूप उशिरा समजते. शांत राहून स्वतःच्या मार्गावर चालत राहणे ही त्यांच्या स्वभावाची खासियत असते.
साधेपणात शोधतात आनंद
मूलांक २, ४ आणि ७ च्या लोकांमध्ये अनेक वेगवेगळे गुण असले, तरी साधेपणा हा त्यांच्यातील एक समान गुण आहे. इतरांच्या नजरेत विशेष दिसण्यापेक्षा ते स्वतःच्या आयुष्यात समाधानी राहणे पसंत करतात. नात्यांमधील आपुलकी, कामातील प्रामाणिकपणा आणि मनातील शांतता यांना ते जास्त महत्त्व देतात. अंकशास्त्रानुसार, यश मिळाल्यानंतरही त्यांचे साधे राहणीमान त्यांना इतरांपेक्षा वेगळी ओळख मिळवून देते.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
