अंकशास्त्रानुसार (Numerology) तुमची जन्मतारीख तुमच्या भविष्याबद्दल, जीवनातील बदल आणि येणाऱ्या चढ-उतारांबद्दल बरंच काही सांगते. जन्मतारखेवरून तुमचा मूलांक ठरवला जातो आणि प्रत्येक मूलांकाचा एक स्वामी ग्रह असतो. या स्वामी ग्रहाच्या प्रभावामुळेच माणसाच्या आयुष्यात समस्या येऊ शकतात किंवा तो यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो.

असे काही मूलांक आहेत ज्यांचे लोक चांगली कमाई करूनही पैसे वाचवू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येत राहतात. जाणून घेऊया अशा मूलांकांबद्दल:

मूलांक ३

मूलांक ३ चे लोक नेहमी आपला पैसा कसा वाढवता येईल याचा विचार करतात. परंतु, त्यांची अवाजवी आणि अनावश्यक खर्च करण्याची सवय त्यांच्यासाठी धनहानीचे योग निर्माण करते. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. गुरुच्या प्रभावामुळे यांच्याकडे पैसा भरपूर असतो. हे लोक नेहमी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्या राहणीमानावर (ग्रूमिंग) खूप खर्च करतात.

अनेकदा हे लोक भावुक होऊनही पैसे खर्च करतात, ज्यामुळे त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२ किंवा २१ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ३ असतो.

मूलांक ५

मूलांक ५ चा स्वामी बुध ग्रह आहे. हे लोक बुद्धीने अतिशय तीक्ष्ण असतात, परंतु अनेकदा विचार न करता चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करतात. त्यांची हीच सवय आर्थिक नुकसानाचे कारण बनते. मूलांक ५ च्या लोकांना कामाच्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव घ्यायला आवडतात. यामुळे ते अनेकदा आपले करिअर बदलतात, ज्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

सतत बदल करण्याच्या नादात हे लोक ना पैसे साठवू शकतात, ना भविष्यासाठी बचत करू शकतात. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ५ असतो.

मूलांक ६

मूलांक ६ चा स्वामी शुक्र ग्रह मानला जातो. या मूलांकाचे लोक आलिशान जीवनशैली (Luxury) आणि मौजमजा आवडणारे असतात. दिखाव्यापोटी ते बऱ्याचदा अशा ठिकाणी पैसे लावतात जिथे त्यांना आर्थिक तोटा होतो.

हे लोक स्वतःचे सौंदर्य आणि ग्रूमिंगवर खूप पैसा खर्च करतात. चांगले उत्पन्न असूनही उधळपट्टीच्या सवयीमुळे ते अडचणीत येतात. याशिवाय घराच्या सजावटीवरही ते भरमसाठ खर्च करतात. ज्यांचा जन्म ६, १५ किंवा २४ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ६ असतो.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)