Numerology: कुठल्याही कार्यक्रमात, पार्टीत किंवा घरातल्या साध्या गेट टुगेदरमध्ये गेल्यावर काही लोक अगदी सहज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. अनोळखी व्यक्तींशीही पटकन मैत्री करतात, गप्पांचा फड रंगवतात आणि त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरणात उत्साह निर्माण होतो. अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट मूलांकाच्या व्यक्तींमध्ये लोकांशी जोडून घेण्याचं हे नैसर्गिक कौशल्य असल्याचं मानलं जातं.
तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा मूलांक ३, ५ किंवा ६ येत असेल, तर अंकशास्त्रानुसार तुमच्यात अशीच खास सोशल स्किल्स असू शकतात. या व्यक्तींचा बोलका स्वभाव, उत्साही व्यक्तिमत्त्व आणि इतरांसोबत सहज मिसळण्याची कला त्यांना गर्दीतही वेगळं स्थान मिळवून देते. तर मग जाणून घेऊया या मूलांकाचे लोक नेमके कसे असतात…
मूलांक ३: बोलण्यातून जिंकतात मनं
ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ३ असतो. अंकशास्त्रात या अंकाचा संबंध गुरु ग्रहाशी जोडला जातो. मूलांक ३ असलेल्या व्यक्ती उत्तम संवादक असल्याचं मानलं जातं. कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही ना काही मनोरंजक असतं. त्यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवताना कंटाळा येत नाही. हे लोक मनमोकळेपणाने बोलतात, विनोद करतात आणि आपल्या बोलण्याने वातावरण हलकं-फुलकं ठेवतात. एखाद्या शांत मेहफिलीतही हे लोक सहज रंग भरू शकतात. संवादकौशल्य, विनोदबुद्धी आणि आत्मविश्वास ही त्यांची खासियत असते.
मूलांक ५: जिंदादिल स्वभावाने सगळ्यांचे लाडके
ज्यांचा जन्म ५, १४ किंवा २३ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ५ असतो. अंकशास्त्रानुसार या अंकाचा स्वामी बुध ग्रह आहे. मूलांक ५ असलेल्या व्यक्ती उत्साही, चंचल आणि जिज्ञासू स्वभावाच्या असतात. एकाच ठिकाणी बसून कंटाळवाणं रुटीन जगणं त्यांना फारसं आवडत नाही. नवीन लोकांना भेटणं, वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं आणि नवनवीन अनुभव घेणं त्यांना आवडतं. त्यांची हजरजबाबी वृत्ती आणि बिनधास्त अंदाज कोणत्याही ग्रुपमध्ये त्यांना लोकप्रिय बनवतो. एखाद्या पार्टीत किंवा मित्रांच्या ग्रुपमध्ये वातावरण शांत असेल, तर मूलांक ५ची व्यक्ती काही मिनिटांतच गप्पांचा मूड तयार करू शकते. ऊर्जा, हजरजबाबीपणा आणि नवीन लोकांशी पटकन मैत्री करण्याची कला ही त्यांची खासियत आहे.
मूलांक ६: आकर्षक व्यक्तिमत्त्वाने जिंकतात सगळ्यांची मनं
ज्यांचा जन्म ६, १५ किंवा २४ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ६ असतो. अंकशास्त्रात या अंकाचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडला जातो. मूलांक ६ असलेल्या व्यक्तींमध्ये आकर्षक आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व असल्याचं मानलं जातं. त्यांचा प्रेमळ, आपुलकीचा आणि काळजी घेणारा स्वभाव इतरांना सहज भावतो. या व्यक्तींना सुंदर दिसणं, स्टायलिश राहणं, घरात किंवा मित्रपरिवारात छान वातावरण निर्माण करणं आवडतं. लोकांना एकत्र आणण्याची आणि नाती जपण्याची त्यांची हातोटीही विशेष मानली जाते. आकर्षक व्यक्तिमत्त्व, प्रेमळ स्वभाव आणि नाती जपण्याची कला ही त्यांची खासियत आहे.
अंकशास्त्रानुसार, मूलांक ३च्या व्यक्ती आपल्या बोलण्याने आणि विनोदबुद्धीने सगळ्यांचं मन जिंकतो. मूलांक ५च्या व्यक्ती आपल्या उत्साही आणि बिनधास्त स्वभावाने महफिलीत रंग भरतो. मूलांक ६च्या व्यक्ती आकर्षक व्यक्तिमत्त्व, प्रेमळपणा आणि काळजी घेण्याच्या स्वभावाने लोकांना जोडून ठेवतो. त्यामुळे तुमचा मूलांक ३, ५ किंवा ६ असेल, तर अंकशास्त्रानुसार तुमच्यात लोकांशी सहज जोडले जाण्याचे गुण असल्याचं मानलं जातं.
