Numerology Mulank 4 Enemy Secrets : अंकशास्त्रात १ ते ९ या सर्व मूलांकांच्या स्वभावाचे आणि त्यांच्या भविष्याचे सखोल विश्लेषण आढळते. ज्योतिषांच्या मते, काही मूलांकांचे लोक मैत्रीसाठी अत्यंत उत्तम असतात, तर एका विशिष्ट मूलांकाच्या व्यक्तीशी शत्रुत्व पत्करणे महागात पडू शकते. जर तुम्ही या मूलांकाच्या व्यक्तीला तुमचा शत्रू बनवले, तर ते तुम्हाला सहजासहजी सोडत नाहीत.

सामान्यता लोक सूर्याचे स्वामित्व असलेला मूलांक १ किंवा शनीचा प्रभाव असलेला मूलांक ८ हे सर्वांत शक्तिशाली आणि कठोर मानले जातात. मंगळाचा मूलांक ९ देखील आपल्या तीव्र राग आणि धाडसासाठी ओळखला जातो. मात्र प्रत्यक्षात, मूलांक ४ चे लोक शत्रुत्व निभावण्याच्या बाबतीत सर्वांत धोकादायक सिद्ध होतात. त्यांची नाराजी आणि पलटवार करण्याची क्षमता इतर सर्व मूलांकांपेक्षा खूप वेगळी असते.

मदतीसाठी तत्पर आणि संकटांना न घाबरणारे

मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे, ज्याला अत्यंत हुशार आणि मायावी ग्रह मानले जाते. राहूच्या प्रभावामुळे या मूलांकाचे लोक अत्यंत चतुर रणनीतीकार असतात. हे लोक स्वभावाने मदतीसाठी तत्पर असतात आणि संकटांना घाबरत नाहीत. मात्र, जर कोणी त्यांच्याशी वाईट वागले, तर ते ती गोष्ट कधीही विसरत नाहीत आणि योग्य वेळेची वाट पाहतात.

या लोकांची सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्यांचे रहस्यमय व्यक्तिमत्त्व आणि अचानक पलटवार करण्याची कला. मूलांक ४ चे लोक वरून शांत दिसू शकतात; परंतु त्यांच्या डोक्यात विरोधकाला पराभूत करण्याच्या योजना सतत सुरू असतात. जोपर्यंत ते आपल्या शत्रूच्या मान-सन्मानाला धक्का पोहोचवत नाहीत किंवा त्याला पूर्णपणे हरवत नाहीत, तोपर्यंत ते हार मानत नाहीत.

अंकशास्त्रानुसार, जिथे जग हात टेकते, तिथे मूलांक ४ चे लोक कठीण समस्यांवरही चुटकीसरशी तोडगा काढतात. राहू आणि केतूचे पौराणिक शत्रुत्व याला प्रमाण आहे, ज्याच्यामुळे सूर्य आणि चंद्रासारख्या शक्तिशाली ग्रहांनाही ग्रहणाचा सामना करावा लागतो.

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक ४ आहे. हे लोक विनाकारण कोणाचेही नुकसान करत नाहीत; परंतु त्यांच्या आत्मसन्मानाशी खेळणे धोक्याचे ठरू शकते. त्यांच्याशी लढा देणे कठीण असते आणि म्हणूनच त्यांच्याशी नेहमी मैत्रीपूर्ण आणि स्पष्ट व्यवहार ठेवणेच फायदेशीर ठरते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)