Numerology : काही लोक आपल्या मनातल्या गोष्टी सहजासहजी कोणाशी शेअर करत नाहीत आणि आपल्या भावना लपवून ठेवतात. अनेक लोकांना कोणतीही गोष्ट दुसऱ्यांना सांगितल्याशिवाय जमत नाही, तर दुसरीकडे काही लोक असे असतात ज्यांना १०० वेळा विचारले तरी त्यांचे गुपित नेहमी गुपितच राहते. असे लोक कधीही कोणाला आपल्या खासगी गोष्टी सांगत नाहीत. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या मूलांकाशी जोडलेला असतो. काही लोकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून त्यांच्या मनात किंवा डोक्यात काय सुरू आहे, हे समजणे कठीण असते. आज आपण अशाच काही मूलांकांबद्दल जाणून घेणार आहोत.

मूलांक ७

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ७ असतो. अंकशास्त्रानुसार या मूलांकाचा संबंध केतू ग्रहाशी असतो. हे लोक स्वभावाने गंभीर आणि सखोल विचार करणारे असतात. मूलांक ७ असणाऱ्या लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणाचाही जास्त हस्तक्षेप आवडत नाही. ते एखाद्या मोठ्या समस्येतून जात असतील किंवा खूप आनंदी असतील, तरीही ते आपल्या भावना सहजासहजी व्यक्त करत नाहीत. अनेकदा त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाही त्यांचा चेहरा पाहून त्यांच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज लावता येत नाही. त्यांना त्यांच्या समस्यांवर स्वतःच उपाय शोधायला अधिक आवडते.

मूलांक ८

कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ८ असतो. अंकशास्त्रात याचा संबंध शनीशी जोडला गेला आहे. हे लोक शांत, गंभीर आणि संयमी स्वभावाचे असतात. मूलांक ८ असणारे लोक कोणावरही लवकर विश्वास ठेवत नाहीत. आपल्या आयुष्यातील चांगले-वाईट अनुभव ते सर्वांना सांगायला घाबरतात. संकट कितीही मोठे असले, तरी ते बहुधा आपल्या चेहऱ्यावर सामान्य भावच ठेवतात. आपली कमजोरी इतरांना दाखवणे हा त्यांचा स्वभाव नसतो.

मूलांक ४

ज्या लोकांचा जन्म ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ४ मानला जातो. अंकशास्त्रात या मूलांकाचा संबंध राहूशी सांगितला आहे. हे लोक वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी आणि आपल्या योजना गुप्त ठेवण्यासाठी ओळखले जातात. मूलांक ४ चे लोक त्यांची कोणतीही योजना पूर्ण होईपर्यंत ती कोणालाही सांगत नाहीत. ते आपल्या भावनाही लपवून ठेवतात. अनेकदा इतरांना त्रास होऊ नये या उद्देशाने ते आपल्या मनातल्या गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवतात.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)