Numerology Introvert Mulank: अंकशास्त्रानुसार जन्मतारखेवरून व्यक्तीचा मूलांक काढला जातो. प्रत्येक मूलांकाचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी जोडला जातो आणि त्या ग्रहाचा व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो. काही मूलांकाच्या व्यक्ती स्वभावाने अंतर्मुखी असल्याचे मानले जाते. त्यांना गर्दीपेक्षा एकांत, सतत लोकांमध्ये राहण्यापेक्षा स्वतःसोबत वेळ घालवणे अधिक आवडते. तर मग जाणून घेऊया कोणत्या मूलांकाचे लोक असता अंतर्मुखी म्हणजेच Introvert…

कोणते मूलांक असतात अंतर्मुखी (Introvert people)?

जन्मतारखेतील अंकांची बेरीज करून मूलांक काढला जातो. उदाहरणार्थ, ११ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक १+१=२ असा होतो. त्यामुळे २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक २ असतो. अंकशास्त्रानुसार मूलांक ४, ७ आणि ९ असलेल्या व्यक्तींमध्ये अंतर्मुखी स्वभावाचे काही गुण दिसू शकतात. या व्यक्तींना स्वतःच्या विचारांमध्ये रमणे, शांत वातावरणात वेळ घालवणे आणि अनावश्यक सामाजिक वावर टाळणे पसंत असते.

मूलांक ४: स्पष्टवक्ते आणि स्वतःच्या विश्वात रमणारे

कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ४ असतो. अंकशास्त्रात मूलांक ४ चा संबंध राहूशी जोडला जातो. या व्यक्ती स्वभावाने स्पष्टवक्त्या आणि थेट बोलणाऱ्या असल्याचे मानले जाते. त्यांना मनातील गोष्ट स्पष्टपणे व्यक्त करायला आवडते. मात्र, प्रत्येक व्यक्तीसोबत लगेच मिसळणे त्यांना सहज जमत नाही. त्यामुळे मोठ्या ग्रुपमध्ये सतत वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या आवडीनुसार आयुष्य जगणे त्यांना अधिक पसंत असू शकते.

मूलांक ७: शांतता आणि एकांत आवडणारे

७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ७ असतो. अंकशास्त्रानुसार या मूलांकाचा संबंध केतूशी जोडला जातो. केतूच्या प्रभावामुळे या व्यक्तींना अध्यात्म, आत्मचिंतन आणि शांत वातावरणाची आवड असल्याचे मानले जाते. गर्दीपासून थोडे दूर राहून स्वतःच्या विचारांमध्ये रमणे त्यांना आवडते. त्यामुळे पार्टी किंवा सततचा सामाजिक वावर यापेक्षा एकांतात शांतपणे वेळ घालवणे त्यांना अधिक सुखद वाटू शकते.

मूलांक ९: ऊर्जावान पण एकांतप्रिय

९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ९ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह मंगळ मानला जातो. मंगळाच्या प्रभावामुळे या व्यक्ती उत्साही, धाडसी आणि ऊर्जावान असल्याचे अंकशास्त्रात सांगितले जाते. मात्र, ऊर्जावान असण्यासोबतच त्यांना स्वतःसाठी वेळ देणेही आवडते. सतत लोकांच्या गराड्यात राहण्यापेक्षा काही वेळ शांततेत घालवणे आणि स्वतःच्या विचारांवर लक्ष केंद्रित करणे त्यांना पसंत असल्याचे मानले जाते.