Numerology Personality Traits: आपल्या आसपास काही लोक असे असतात, जे सुरुवातीला खूप विश्वासू, मैत्रीपूर्ण वाटतात… पण वेळ आल्यावर अचानक त्यांचं वागणं बदलतं. कालपर्यंत जवळचे वाटणारे हेच लोक एका क्षणात दुरावतात, कधी कधी फायद्यासाठी भूमिका बदलतात. हे नेमकं का घडतं? यामागे काही ज्योतिषशास्त्रीय कारण असू शकतं का? अंकज्योतिषानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेप्रमाणे त्या व्यक्तीचा स्वभाव, विचारसरणी व निर्णय घेण्याची पद्धत ठरते. काही विशिष्ट मूलांक असलेले लोक बुद्धिमान, मेहनती आणि तर्कशुद्ध असतात; पण त्यांच्यात काही विरोधाभासी गुणही दिसून येतात, जे अनेकदा इतरांना गोंधळात टाकतात.
हुशार; पण हट्टी -दोन टोकांचा स्वभाव
ज्योतिषशास्त्र सांगतं की, काही लोक अत्यंत कष्टाळू आणि तर्कशुद्ध विचार करणारे असतात. ते कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी जिद्दीनं प्रयत्न करतात. नेतृत्व, राजकारण किंवा मोठे निर्णय घेण्याच्या क्षेत्रात हे लोक आपली छाप उमटवतात; पण याच गुणांसोबत हट्टीपणा ही एक गोष्ट त्यांच्यात ठळकपणे दिसते. स्वतःच्या मतावर ठाम राहणं, इतरांचं मत सहजपणे न स्वीकारणं यांमुळे अनेकदा वाद निर्माण होतात.
फायदा दिसला की बदलतो रंग?
काही वेळा असे लोक परिस्थितीनुसार आपली भूमिका बदलतात, असं मानलं जातं. म्हणजेच जेव्हा त्यांना स्वतःचा फायदा दिसतो तेव्हा ते पटकन निर्णय बदलू शकतात. अर्थात, हा कोणताही ठाम दावा नाही; परंतु ज्योतिषशास्त्रीय शक्यतेनुसार, काही व्यक्तींमध्ये अशी प्रवृत्ती दिसू शकते. त्यामुळे त्यांच्या वागण्यात कधी कधी अनपेक्षित बदल जाणवतात.
गोंधळ, भ्रम आणि अनिश्चितता
या प्रकारच्या व्यक्तींमध्ये कधी कधी गोंधळलेले विचार, अतार्किक भूमिका किंवा अचानक घेतलेले निर्णय दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या आसपासचे लोक सावध राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याच लोकांमध्ये एक वेगळी बाजूही असते, ते अत्यंत हुशार असतात आणि त्यांच्याकडे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची अफाट क्षमता असते.
क्षणात यश; पण तितक्याच वेगाने घसरणही
अंकज्योतिषानुसार, काही लोक अचानक मोठं यश मिळवतात. एकाच क्षणात त्यांच्या आयुष्यात मोठा बदल होतो आणि संपत्ती, प्रतिष्ठा, नाव मिळतं. पण जर त्यांनी आपल्या सवयींवर नियंत्रण ठेवलं नाही, तर त्याच वेगानं ते खालीही येऊ शकतात. म्हणूनच या लोकांसाठी संतुलन राखणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.
कोण आहेत ‘हे’ लोक?
इतकं सगळं वाचल्यानंतर प्रश्न पडतोच नेमक्या कोणत्या लोकांबद्दल ही चर्चा आहे?
अंकज्योतिषानुसार, ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ व ३१ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ४ मानला जातो.
या व्यक्तींच्या स्वभावात वरील गुण आढळू शकतात. मात्र, हे केवळ ज्योतिषशास्त्रीय अंदाज आहेत आणि प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.
म्हणूनच कोणावरही ठाम मत बनविण्याआधी त्यांना समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
