Mulank 9 Personality: अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जन्मतारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमच्या करिअरमधील, स्वभाव, गुण, अवगुण अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख १० असेल तर तुमचा मूलांक १+०=१ म्हणजे १ आहे. दरम्यान, आज आपण अशा मूलांकाच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे वर्चस्व घरात, मित्र-मैत्रिणींवर आणि कामाच्या ठिकाणीही पाहायला मिळते.

‘या’ मूलांकाचे लोक प्रचंड धाडसी असतात

ज्यांची जन्मतारीख ९, १८, २७ आहे. अशा व्यक्तींचा मूलांक ९ असतो. मंगळाचा मूलांक असल्यामुळे हे लोक अति साहस, राग, बेधडक वागणे‌, मेहनती, प्रचंड उत्साही, अतिशय हुशार आणि कर्तृत्ववान असतात. या मूलांकावर मंगळ ग्रहाचा अधिक प्रभाव असतो ज्यामुळे या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता उत्तम असते. हे लोक कोणाच्याही दबावाखाली राहू शकत नाहीत, त्यामुळे यांच्या हुशारीमुळे ते आपल्या क्षेत्रात इतरांच्या तुलनेत पुढे असतात.

खूप स्वाभिमान असतात

मूलांक ९ असलेले लोक खूप स्वाभिमानी आणि निर्भय असतात. हे लोक धोका पत्करण्यातही पुढे मागे पाहत नाहीत. हे उत्साही आणि धैर्यवान असतात शिवाय प्रतिकूल परिस्थितीचा धैर्याने सामना करतात. मात्र, कधी कधी त्यांना खूप राग येतो. यांच्यातील खास गुण म्हणजे हे लोक हजरजबाबी,लगेच प्रतिसाद देणारे, स्पष्टवक्तेही असतात आणि त्यांना मोकळेपणाने बोलायला आवडते. यांच्या या स्वभावामुळे या लोकांचे काही लोकांशी संबंध बिघडतात. हे लोक कोणाला घाबरत नाहीत. हे लोक प्रत्येक कामात गती दाखवतात, त्यांना निष्काळजीपणा आवडत नाही. शिवाय त्यांच्याशी कोणी गैरवर्तन केले किंवा त्यांची फसवणूक केली तर त्यांना चांगलाच धडा शिकवतात.

कोणत्याही क्षेत्रात मिळवतात प्रचंड यश

मूलांक ९ असलेल्या लोकांसाठी प्रत्येक क्षेत्र लाभदायी मानले जाते. कारण, हे लोक कोणत्याही क्षेत्रात मन लावून व्यवस्थित काम करतात. त्यांच्या कामाचा वेग आणि शिस्त पाहून त्यांचे सहकर्मचारीही थक्क होतात. यांच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. या मूलांकाच्या लोकांना सर्वात जास्त यश पोलिस, सैन्य, क्रीडा आणि वैद्यकीय क्षेत्रात खूप यश मिळते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)