Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जन्मतारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमच्या करिअरमधील, स्वभाव, गुण, अवगुण अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख १० असेल तर तुमचा मूलांक १+०=१ म्हणजे १ आहे. दरम्यान, आज आपण अशा मूलांकाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे वर्चस्व घरात, मित्र-मैत्रिणींवर आणि कामाच्या ठिकाणीही पाहायला मिळते.

मूलांक ९ असलेले लोक

अंकशास्त्रात, ९ हा मूलांक खूप प्रभावशाली आणि ऊर्जावान मानला जातो. कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्यांचा लोकांचा मूलांक ९ असतो. या अंकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे, जो धैर्य, नेतृत्व, ऊर्जा, संघर्ष, भूमी, भवन या गोष्टींचा कारक स्वामी मानला जातो. म्हणूनच, ९ मूलांक असलेली मंडळी निर्भय, मेहनती आणि त्यांच्या ध्येयांसाठी अत्यंत समर्पित असतात. ही लोक कठीण परिस्थितीतही खंबीर असतात आणि त्यांच्या कठोर परिश्रमाने यश मिळवण्याची क्षमता राखतात. या लोकांमध्ये बहुतेकदा नेतृत्वगुण असतात. त्यांच्यात इतरांना प्रेरणा देण्याची विशेष क्षमता असते. म्हणूनच धैर्य, निर्णयक्षमता, जबाबदारी आवश्यक असलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतात.

मूलांक ९ असलेले लोक खूप स्वाभिमानी आणि निर्भय असतात. हे लोक धोका पत्करण्यातही पुढे मागे पाहत नाहीत. हे उत्साही आणि धैर्यवान असतात शिवाय प्रतिकूल परिस्थितीचा धैर्याने सामना करतात. मात्र, कधी कधी त्यांना खूप राग येतो. यांच्यातील खास गुण म्हणजे हे लोक हजरजबाबी,लगेच प्रतिसाद देणारे, स्पष्टवक्तेही असतात आणि त्यांना मोकळेपणाने बोलायला आवडते. यांच्या या स्वभावामुळे या लोकांचे काही लोकांशी संबंध बिघडतात. हे लोक कोणाला घाबरत नाहीत. हे लोक प्रत्येक कामात गती दाखवतात, त्यांना निष्काळजीपणा आवडत नाही. शिवाय त्यांच्याशी कोणी गैरवर्तन केले किंवा त्यांची फसवणूक केली तर त्यांना चांगलाच धडा शिकवतात.

मूलांक ५ असलेले लोकही तितकेच प्रभावी

कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. या संख्येवर बुध ग्रहाचे वर्चस्व असते; जो ज्योतिषशास्त्रात बुद्धी, वाणी, व्यवसाय, व्यापार आणि ज्ञानाचा देव मानला जातो. ५ मूलांक असलेले लोक खूप बुद्धिमान असतात, स्वतःचे निर्णय घेण्यात पारंगत असतात. फक्त त्यांची आणि विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. ही मंडळी नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक यशस्वी होतात. त्यांची जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीची समज त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. ही मंडळी जोखीम घेण्यास घाबरत नाहीत. शेअर बाजारात किंवा व्यवसायात नफा मिळवण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यांच्या आयुष्यात अनेकदा आर्थिक प्रगती आणि समृद्धी येते; ज्यामुळे ते त्यांच्या प्रयत्नांनी लवकर श्रीमंत होतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)