Numerology Personality Traits: अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेचा तिच्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्त्वावर काही ना काही प्रभाव असतो, असे मानले जाते. प्रत्येक मूलांकामध्ये काही खास गुण असतात. कोणी जन्मजात लीडर असतो, कोणी अत्यंत संवेदनशील, तर कोणी धाडसी आणि महत्त्वाकांक्षी. मात्र, प्रत्येक चांगल्या गुणाची एक दुसरी बाजूही असू शकते.

अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांकाची एक ‘डार्क साइड’ किंवा कमकुवत बाजू असते. ही बाजू योग्य प्रकारे हाताळली नाही, तर नातेसंबंध, करिअर, आर्थिक निर्णय आणि मानसिक शांततेवर परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते.

तुमचा मूलांक काढण्यासाठी जन्मतारखेतील अंकांची बेरीज केली जाते. उदाहरणार्थ, एखाद्याचा जन्म २५ ऑगस्टला झाला असेल, तर २+५ = , त्यामुळे त्याचा मूलांक ७ मानला जातो. अंकशास्त्रात १ ते ९ असे एकूण ९ मूलांक मानले जातात. तर मग जाणून घेऊया, तुमच्या मूलांकाची कोणती सवय तुमच्यासाठी अडचणीची ठरू शकते.

मूलांक १ – आत्मविश्वास की अहंकार? (जन्मतारीख: १, १०, १९, २८)

मूलांक १ असलेल्या व्यक्तींना अंकशास्त्रात सूर्याशी जोडले जाते. त्यामुळे नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहण्याची वृत्ती त्यांच्यात असल्याचे मानले जाते. पण हाच आत्मविश्वास कधी कधी अहंकारात बदलू शकतो. आपलेच मत योग्य असल्याचा अट्टहास, दुसऱ्याचे ऐकून न घेणे किंवा सतत स्वतःचे म्हणणे लादण्याची सवय निर्माण होऊ शकते. नात्यांमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केल्यास समोरची व्यक्ती दूर जाऊ शकते.

डार्क साइड: हट्टीपणा, अहंकार आणि नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती.

मूलांक २ – भावनांच्या भोवऱ्यात अडकतात? (जन्मतारीख: २, ११, २०, २९)

मूलांक २ चा संबंध चंद्राशी जोडला जातो. या व्यक्ती संवेदनशील, प्रेमळ आणि भावनिक असतात, असे अंकशास्त्रात मानले जाते. मात्र, अतिसंवेदनशीलता हीच त्यांची कमकुवत बाजू ठरू शकते. एखाद्याने छोटंसं काही बोललं तरी ते मनावर घेण्याची शक्यता असते. त्यानंतर त्याच गोष्टीचा वारंवार विचार करण्याची सवय लागू शकते. पार्टनरचा मेसेज उशिरा का आला, मित्राने असे का बोलले, याचा विचार करत बसल्याने गैरसमज वाढू शकतात.

डार्क साइड: ओव्हरथिंकिंग, मूड स्विंग्स आणि भावनिक अस्थिरता.

मूलांक ३ – ज्ञानाचा अतिरेक ‘ओव्हरकॉन्फिडन्स’ बनतो? (जन्मतारीख: ३, १२, २१, ३०)

मूलांक ३ असलेल्या व्यक्तींमध्ये ज्ञान, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास चांगला असल्याचे मानले जाते. मात्र, या गुणांचा अतिरेक झाला तर ‘मला सर्वकाही माहीत आहे’ अशी भावना निर्माण होऊ शकते. स्वतःचीच बाजू योग्य मानणे, दुसऱ्यांचे मत सहज न स्वीकारणे आणि आपली प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त खर्च करणे, हे त्यांच्या डार्क साइडमध्ये येऊ शकते.

डार्क साइड: ओव्हरकॉन्फिडन्स, दिखावा आणि स्वतःच्या मताचा अट्टहास.

मूलांक ४ – चौकटीच्या बाहेर जाण्याची सवय ठरू शकते अडचणीची! (जन्मतारीख: ४, १३, २२, ३१)

मूलांक ४ ला अंकशास्त्रात राहूशी जोडले जाते. या व्यक्ती वेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या आणि पारंपरिक चौकटी मोडून काहीतरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या असतात, असे मानले जाते. मात्र, हीच बंडखोर वृत्ती कधी कधी प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याच्या सवयीत बदलू शकते. लोकांवर पटकन विश्वास न ठेवणे, सतत संशय घेणे आणि अचानक राग व्यक्त करणे यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.

डार्क साइड: संशय, बंडखोर वृत्ती आणि अचानक राग.

मूलांक ५ – सतत बदलाची हुरहूर! (जन्मतारीख: ५, १४, २३)

मूलांक ५ चा संबंध बुधाशी जोडला जातो. नवीन गोष्टी शिकणे, बदल स्वीकारणे आणि सतत काहीतरी वेगळे करण्याची इच्छा हा या मूलांकाचा गुण मानला जातो. पण सतत बदलाची गरज हीच कमकुवत बाजू बनू शकते. एका कामाचा कंटाळा आला की दुसऱ्या कामाकडे वळणे, निर्णय वारंवार बदलणे किंवा विचार न करता जोखीम घेणे याचा करिअरवर परिणाम होऊ शकतो.

डार्क साइड: चंचलपणा, अस्थिर निर्णय आणि अधीरता.

मूलांक ६ – प्रेम की पझेसिव्हनेस? (जन्मतारीख: ६, १५, २४)

मूलांक ६ ला शुक्राशी जोडले जाते. प्रेम, सौंदर्य, सुख-सुविधा आणि नात्यांना महत्त्व देणाऱ्या व्यक्ती या मूलांकात येतात, असे अंकशास्त्र सांगते. पण प्रेमाचे रूपांतर अतिपझेसिव्हनेस किंवा संशयात होऊ शकते. पार्टनरच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे, त्यांच्या निर्णयांमध्ये जास्त हस्तक्षेप करणे किंवा भौतिक सुखांच्या मागे जास्त धावणे नात्यांमध्ये तणाव निर्माण करू शकते.

डार्क साइड: पझेसिव्हनेस, संशय आणि भौतिक गोष्टींचा अतिरेक.

मूलांक ७ – स्वतःभोवतीच भिंत उभी करतात? (जन्मतारीख: ७, १६, २५)

मूलांक ७ चा संबंध केतूशी जोडला जातो. या व्यक्तींमध्ये अध्यात्म, चिंतन आणि एकांताची आवड असल्याचे मानले जाते. मात्र, एकांताची आवड कधी कधी स्वतःला इतरांपासून पूर्णपणे दूर ठेवण्यामध्ये बदलू शकते. आपल्या भावना इतरांसोबत शेअर न करणे, प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणे आणि लोकांवर सहज विश्वास न ठेवणे यामुळे भावनिक अंतर निर्माण होऊ शकते.

डार्क साइड: अलिप्तपणा, अतिविचार आणि भावना मनात दडवून ठेवणे.

मूलांक ८ – यशाच्या मागे धावताना नाती विसरू नका! (जन्मतारीख: ८, १७, २६)

मूलांक ८ चा संबंध शनिशी जोडला जातो. मेहनत, शिस्त, संघर्षातून यश मिळवण्याची वृत्ती आणि महत्त्वाकांक्षा हे या मूलांकाचे महत्त्वाचे गुण मानले जातात. पण पैसा, यश आणि अधिकार मिळवण्याची धडपड इतकी वाढू शकते की भावनिक नाती आणि स्वतःच्या मानसिक शांततेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. स्वतःच्या मतावर ठाम राहण्यामुळे जवळच्या व्यक्तींशी वाद होऊ शकतात.

डार्क साइड: अति महत्त्वाकांक्षा, हट्टीपणा आणि कामाचा अति ताण.

मूलांक ९ – रागाचा ‘ज्वालामुखी’! (जन्मतारीख: ९, १८, २७)

मूलांक ९ चा संबंध मंगळाशी जोडला जातो. त्यामुळे धाडस, ऊर्जा, उत्साह आणि आक्रमकपणा हे गुण या व्यक्तींमध्ये असल्याचे अंकशास्त्रात मानले जाते. मात्र, रागावर नियंत्रण ठेवणे हे मोठे आव्हान ठरू शकते. छोट्या गोष्टीवर तीव्र प्रतिक्रिया देणे, रागाच्या भरात कठोर शब्द बोलणे आणि नंतर त्याचा पश्चात्ताप होणे असे प्रसंग घडू शकतात. घाईघाईने घेतलेले निर्णय करिअर, पैसा किंवा नातेसंबंधांमध्ये अडचणी निर्माण करू शकतात.

डार्क साइड: राग, घाईघाईने निर्णय घेणे आणि तीव्र प्रतिक्रिया.