Numerology Predictions : प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. काही लोक स्वभावाने शांत असतात; तर काही जण आपल्या बोलण्याने इतरांना सहज प्रभावित करतात. अंकशास्त्रानुसार असे काही मूलांक आहेत, ज्यांचे लोक आपल्या मनातील खरी माहिती किंवा भावना लवकर बाहेर दाखवत नाहीत. ‘मुखी गोड आणि मनी कपट’ या म्हणीनुसार समोरून गोड बोलून पाठीमागून वार करणे, हा स्वभाव अंकशास्त्रातील ४, ५ व ८ या मूलांकाच्या व्यक्तींच्या बाबतीत बऱ्याच अंशी खरा ठरतो. चला तर मग जाणून घेऊया या मूलांकाच्या लोकांची वैशिष्ट्ये:

मूलांक ४

मूलांक ४ चे लोक अत्यंत चतुर, समंजस आणि रणनीती आखण्यात पटाईत मानले जातात. हे लोक कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे यांवर सखोल विचार करतात. अनेकदा त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा अंदाज करणे कठीण असते. हे लोक आपल्या योजना आणि विचार प्रत्येकासमोर उघड करत नाहीत. काही प्रसंगांत त्यांचे हे वर्तन इतरांना गूढ किंवा चलाखीचे वाटू शकते. हे समोरच्या व्यक्तीशी इतके गोड बोलतात की, त्यांच्या डोक्यात काय शिजतेय हे समजणे कठीण जाते.

मूलांक ५

मूलांक ५ चे लोक संवाद साधण्यात खूप कुशल असतात. त्यांचे बोलणे प्रभावशाली असते आणि ते आपल्या संभाषणाने इतरांना पटकन आपलेसे करतात. त्यांना नवीन लोकांना भेटणे आणि मित्र बनवणे आवडते. मात्र, कधी कधी त्यांची चलाखी आणि गोष्टी फिरवून सांगण्याची सवय लोकांना संभ्रमात टाकते. स्वतःचे म्हणणे खरे कसे हे पटवून सांगण्यासाठी ते शब्दांचा खूप विचारपूर्वक वापर करतात. याच कारणामुळे काही लोक त्यांना गरजेपेक्षा जास्त हुशार किंवा चलाख समजू शकतात.

मूलांक ८

मूलांक ८ चे लोक गंभीर, संयमी आणि गूढ स्वभावाचे असतात. हे लोक आपल्या भावना सहजगत्या कोणासमोर व्यक्त करत नाहीत आणि इतरांवर विश्वास ठेवायलाही वेळ घेतात. अनेकदा त्यांचे मौन आणि गंभीर वर्तन लोक चुकीच्या अर्थाने घेतात. आपल्या योजना गुप्त ठेवणे त्यांना आवडते आणि ते प्रत्येक गोष्टीचे उत्तर लगेच देत नाहीत. अर्थात, याचा अर्थ असा नाही की, अशा स्वभावाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल काही वाईट असते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)