IPL Stars Numerology Secrets: आयपीएल २०२६ चा हंगाम संपला, विजेतेपदाचा चषकही उंचावला गेला आणि मैदानावरील अनेक रोमांचक क्षण चाहत्यांच्या स्मरणात कायमचे कोरले गेले. यंदाच्या हंगामात काही खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या खेळातील आत्मविश्वास, दबावाच्या क्षणी घेतलेले निर्णय आणि प्रतिस्पर्ध्यांवर मिळवलेलं वर्चस्व पाहून अनेकांना एक प्रश्न पडला आहे, या यशामागे केवळ मेहनत आणि कौशल्य आहे की आणखी काही?

अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेशी संबंधित काही विशिष्ट वैशिष्ट्ये असतात. अर्थात, याला कोणताही वैज्ञानिक आधार नसून या केवळ ज्योतिषशास्त्रीय आणि अंकशास्त्रीय मान्यता आहेत. मात्र, अनेकांना या गोष्टींबद्दल उत्सुकता असते.

यंदाच्या आयपीएलमध्ये काही खेळाडूंनी ज्या प्रकारे खेळ केला, त्यानंतर त्यांच्या जन्मांकांची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. काही अंक असे मानले जातात की ते नेतृत्व, धाडस, आत्मविश्वास आणि रणनीतीशी संबंधित असतात. अशा लोकांमध्ये संकटांचा सामना करण्याची क्षमता अधिक असल्याची अंकशास्त्रातील धारणा आहे.

काही लोक मैदानात उतरतात आणि वातावरणच बदलून टाकतात. दबावाच्या क्षणीही ते शांत राहतात, योग्य निर्णय घेतात आणि संधीचं सोनं करतात; तर काही जण आक्रमकतेने प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडतात. अंकशास्त्रात अशा स्वभावामागे विशिष्ट मूलांकांचा प्रभाव असल्याचं मानलं जातं.

यंदाच्या हंगामात अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या आणि संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंच्या जन्मतारखांकडे पाहिल्यानंतर अंकशास्त्र अभ्यासकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काही मूलांक असलेले लोक नेतृत्व करण्यात पुढे असतात, तर काही लोकांना रणनीती आखण्यात विशेष प्रावीण्य मिळतं अशी मान्यता आहे.

विशेष म्हणजे, काही खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत दाखवलेली जिद्द, सातत्य आणि दबाव झेलण्याची क्षमता या गुणांचा संबंधही काही विशिष्ट मूलांकांशी जोडला जातो, त्यामुळे चाहत्यांमध्येही आपल्या जन्मतारखेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा काही संबंध आहे का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

मग नेमके कोणते आहेत हे मूलांक?

अंकशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ मानला जातो. नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि पुढाकार घेण्याची वृत्ती या लोकांमध्ये असल्याचं सांगितलं जातं.

तसेच ८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ८ असतो. हे लोक शांतपणे काम करणारे, रणनीती आखणारे आणि योग्य वेळेची वाट पाहणारे मानले जातात.

तर ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ९ असतो. धाडस, जोखीम घेण्याची तयारी आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता यांच्याशी हा मूलांक जोडला जातो.

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी यांच्या जन्मतारखांशी संबंधित मूलांकांची चर्चा याच कारणामुळे होत आहे. अर्थात, त्यांच्या यशाचं खरं श्रेय मेहनत, सराव, कौशल्य आणि सातत्यालाच जातं. मात्र, अंकशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास त्यांच्या जन्मांकांबाबत अनेक रंजक शक्यता व्यक्त केल्या जातात.

तुमची जन्मतारीखही या आकड्यांमध्ये येते का? असेल, तर अंकशास्त्रानुसार तुमच्यामध्येही नेतृत्व, धाडस किंवा रणनीतीची क्षमता असू शकते, अशी मान्यता आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)