October Grah Gochar : ऑक्टोबर २०२६ हा ग्रहस्थितीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण महिना असेल. या महिन्यात ग्रहस्थितीमध्ये मोठे बदल घडतील, ज्याचा परिणाम सर्व १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. काही राशींसाठी हा काळ नवीन संधी आणि प्रगतीची चिन्हे घेऊन येऊ शकतो, तर इतरांना सावधगिरीने पुढे जाण्याची गरज भासू शकते. विशेष म्हणजे, ऑक्टोबरमध्ये अनेक युती घडतील, ज्यामुळे हा महिना आणखी खास ठरेल. कोणते ग्रह आपली भ्रमण स्थिती बदलतील, कोणत्या विशेष युती तयार होतील, हा महिना कोणत्या राशींसाठी शुभसंकेत घेऊन येईल? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

ऑक्टोबरमध्ये ‘या’ ग्रहांचे गोचर होईल

शुक्र गोचर

ऑक्टोबरच्या सुरुवातीला, शुक्र स्वतःच्या राशीत, म्हणजेच तूळ राशीत असेल. ३ ऑक्टोबर रोजी, शुक्र या राशीत वक्री भ्रमण सुरू करेल. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून शुक्राचे स्वतःच्या राशीत असणे महत्त्वपूर्ण मानले जाते. वक्री शुक्राच्या प्रभावामुळे प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, सुखसोयी, कला आणि आर्थिक बाबींशी संबंधित निर्णयांमध्ये काही चढ-उतार येऊ शकतात. यानंतर, २४ ऑक्टोबर रोजी शुक्र चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार, ज्यामुळे ग्रहस्थितीत आणखी एक बदल होईल.

सूर्य राशी प्रवेश

१७ ऑक्टोबर, २०२६ रोजी सूर्य कन्या राशी सोडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य तूळ राशीत प्रवेश करताच, तो तेथे आधीच असलेल्या शुक्राबरोबर युती करेल. सूर्य व शुक्र यांच्यातील या युतीमुळे शुक्रादित्य योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आत्मविश्वास, सन्मान, नेतृत्वाचा घटक मानला जातो. तर शुक्र सुखसोयी, कला, सौंदर्य आणि भौतिक समृद्धीशी संबंधित आहे. त्यामुळे, ही युती ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जाते.

बुध वक्री

बुध देखील ऑक्टोबरमध्ये आपली राशी बदलून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर, २४ ऑक्टोबर रोजी बुध वक्री होईल. बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, तर्क, व्यवसाय आणि संवाद यासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. त्यामुळे, बुधाच्या वक्री गतीदरम्यान वाटाघाटी, कागदपत्रे, व्यावसायिक करार आणि महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये बुध व मंगळ यांची युती देखील होईल, ज्यामुळे ग्रहांच्या स्थितीवर आणखी परिणाम होऊ शकतो.

मंगळ गोचर

मंगळ संपूर्ण ऑक्टोबर महिनाभर कर्क राशीत राहील. १७ ऑक्टोबर रोजी मंगळ आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा धैर्य, ऊर्जा, भूमी, शौर्य आणि उत्साहाचा घटक मानला जातो. तर कर्क राशी भावना आणि संवेदनशीलतेशी संबंधित आहे. त्यामुळे, मंगळाची ही स्थिती भावनिक आणि कौटुंबिक बाबींसाठी देखील महत्त्वाची मानली जाऊ शकते. मंगळाच्या स्थितीचा प्रभाव व्यक्तीच्या कुंडलीनुसार बदलू शकतो.

सिंह गोचर

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी, गुरू ग्रह कर्क राशी सोडून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. हा राशीबदल या महिन्यातील प्रमुख ग्रह संक्रमणांपैकी एक असणार आहे. गुरू ग्रहाला ज्ञान, शिक्षण, संतती, संपत्ती, धर्म आणि विस्ताराचा ग्रह मानले जाते. गुरूच्या सिंह राशीतील प्रवेशामुळे अनेक राशींसाठी महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात. या संक्रमणाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रानुसार केवळ वैयक्तिक जीवनावरच नव्हे, तर शिक्षण, करिअर, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा यांसारख्या बाबींवरही दिसून येतो.

ऑक्टोबरमध्ये कोणते विशेष योग तयार होणार आहेत?

त्रिग्रही योग

ऑक्टोबरच्या सुरुवातीला, कर्क राशीत चंद्र, मंगळ आणि गुरू यांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होईल. ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान तयार होणारी ही युती चंद्राच्या वेगवान गतीमुळे जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे एकाच राशीत तीन ग्रहांची उपस्थिती महत्त्वपूर्ण मानली जाईल. त्यामुळे, या कालावधीतील या युतीचे अनेक राशींसाठी विशेष परिणाम होऊ शकतात.

बुधादित्य योग

१७ ऑक्टोबर रोजी सूर्य तूळ राशीत प्रवेश केल्यानंतर, सूर्य आणि बुध एकाच राशीत असतील. या दोन ग्रहांच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला आत्मविश्वास, आदर आणि नेतृत्वाचा घटक मानले जाते, तर बुधाला बुद्धिमत्ता, वाणी, तर्क आणि व्यवसायाचा घटक मानले जाते. त्यामुळे, हा योग या क्षेत्रांशी संबंधित बाबींसाठी महत्त्वाचा मानला जातो.

लक्ष्मी नारायण योग

ऑक्टोबरमध्ये तूळ राशीतील बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग देखील तयार होईल. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, बुध आणि शुक्राची युती संपत्ती, सुखसोयी, कला, व्यवसाय आणि समृद्धीशी संबंधित आहे. त्यामुळे, हा योग आर्थिक आणि भौतिक सुखसोयींशी संबंधित बाबींसाठी विशेष मानला जातो.

मालव्य योग

ऑक्टोबरमध्ये शुक्र स्वतःच्या राशीत, म्हणजेच तूळ राशीत असल्यामुळे मालव्य योग तयार होईल. याचा समावेश पंच महापुरुष योगांमध्ये होतो. मालव्य योग हा सौंदर्य, सुखसोयी, कला, भौतिक समृद्धी आणि आकर्षण यांच्याशी संबंधित मानला जातो. शुक्राच्या बलवान स्थितीमुळे या योगाला विशेष महत्त्व दिले जाते.

शुक्रदित्य योग

१७ ऑक्टोबर रोजी, सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल तेव्हा, तो आधीच तेथे असलेल्या शुक्रासोबत युती करणार आहे. सूर्य आणि शुक्राच्या या युतीला शुक्रदित्य योग म्हणतात. ज्योतिषीय गणनेनुसार, ही युती ६ नोव्हेंबरपर्यंत प्रभावी राहू शकते. सूर्य व शुक्र हे दोन्ही वेगवेगळ्या क्षेत्रांचे कारक मानले जातात. त्यामुळे त्यांची युती करिअर, प्रतिष्ठा, सुखसोयी आणि सर्जनशीलतेशी संबंधित मानली जाते.

ऑक्टोबर महिना कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे?

मेष, कर्क, कन्या, तूळ, मीन

कोणत्या राशींनी सावधगिरी बाळगावी?

वृषभ, मिथुन, सिंह, वृश्चिक, धनु, कुंभ

पण, लक्षात ठेवा की, कोणत्याही गोचर किंवा योगाचा प्रत्यक्ष परिणाम व्यक्तीची कुंडली, लग्न, दशा आणि ग्रहांच्या स्थितीनुसार बदलू शकतो. त्यामुळे, येथे दिलेल्या राशी सामान्य ज्योतिषीय गणनेवर आधारित आहेत.