October 2026 Rajyog 4 Zodiac Signs to Benefit: वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांची युती, राशीतील त्यांचे स्थान आणि गोचर यांना विशेष महत्त्व दिले जाते. ग्रहांच्या विशिष्ट स्थितीतून तयार होणाऱ्या शुभ योगांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनातील विविध क्षेत्रांवर होऊ शकतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. मात्र, या योगांचा प्रभाव प्रत्येकाच्या जन्मकुंडलीनुसार वेगवेगळा असू शकतो.

ऑक्टोबर २०२६ हा ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टीने महत्त्वाचा महिना ठरण्याची शक्यता आहे. या काळात त्रिग्रही योग, बुधादित्य राजयोग, लक्ष्मी नारायण राजयोग व मालव्य राजयोग असे चार शुभ योग तयार होणार असल्याचे ज्योतिषीय गणित सांगते. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींसाठी करिअर, आर्थिक स्थिती, व्यवसाय व मान-सन्मान यांच्याशी संबंधित बदलांची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, या योगांपैकी कोणता योग नेमका कधी तयार होणार आणि त्याचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर प्रभाव पडू शकतो? चला पाहूया…

४ ऑक्टोबरपासून त्रिग्रही योग

महिन्याची सुरुवातच एका विशेष ग्रहस्थितीने होण्याची शक्यता आहे. ४ ऑक्टोबर रोजी चंद्र कर्क राशीत प्रवेश करील. यावेळी देवगुरू बृहस्पती आणि मंगळ आधीपासूनच या राशीत असल्याने चंद्र, गुरू व मंगळाची युती होईल. त्यामुळे त्रिग्रही योग तयार होण्याची शक्यता असून, त्याचा प्रभाव ६ ऑक्टोबरपर्यंत राहू शकतो.

१७ ऑक्टोबरला बुधादित्य राजयोग

त्यानंतर १७ ऑक्टोबरला सूर्य कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करील. त्यावेळी बुध तूळ राशीत असल्याने सूर्य आणि बुधाची युती होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रात या संयोगाला बुधादित्य राजयोग, असे म्हटले जाते. सूर्याला आत्मविश्वास, पद आणि प्रतिष्ठेशी; तर बुधाला बुद्धिमत्ता, संवादकौशल्य आणि व्यवसायाशी जोडले जाते.

२० ऑक्टोबरला लक्ष्मीनारायण राजयोग

२० ऑक्टोबरला आणखी एक महत्त्वाची ग्रहस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. शुक्र तूळ राशीत प्रवेश करील. तूळ ही शुक्राची स्वराशी मानली जाते. या राशीत बुधाची उपस्थिती असल्याने बुध-शुक्र युती होऊन लक्ष्मीनारायण राजयोग तयार होऊ शकतो. ज्योतिषीय मान्यतेनुसार हा योग धन, सुख-सुविधा, कला, व्यापार व वैभव यांच्याशी संबंधित मानला जातो.

त्याच दिवशी मालव्य राजयोग

शुक्राच्या तूळ राशीतील प्रवेशामुळे याच दिवशी मालव्य राजयोग तयार होण्याची शक्यता आहे. पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेला हा योग शुक्र स्वतःच्या राशीत किंवा उच्च राशीत केंद्रस्थानी असताना तयार होतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. त्यामुळे भौतिक सुख-सुविधा, ऐश्वर्य आणि प्रतिष्ठेशी संबंधित सकारात्मक शक्यता व्यक्त केली जाते.

३१ ऑक्टोबरला गुरूचे सिंह राशीत गोचर

महिन्याच्या अखेरीस आणखी एक मोठा ग्रहबदल होण्याची शक्यता आहे. ३१ ऑक्टोबरला देवगुरू बृहस्पती कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करील. गुरू हा ज्ञान, शिक्षण, समृद्धी आणि विस्ताराचा कारक मानला जातो. त्यामुळे या गोचरालाही ज्योतिषशास्त्रात महत्त्व दिले जाते.

कर्क

करिअर आणि आर्थिक बाबतीत काही नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती, पगारवाढ किंवा मनासारखी जबाबदारी मिळण्याचे संकेत मानले जातात. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होण्याची शक्यता असून, अडकलेली काही आर्थिक कामे मार्गी लागू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक किंवा मान-सन्मान मिळण्याचीही शक्यता आहे.

सिंह

महिन्याचा उत्तरार्ध विशेष लक्षवेधी ठरू शकतो. काही काळापासून रखडलेली कामे पुन्हा वेग घेण्याची शक्यता आहे. शिक्षण, उच्च शिक्षण किंवा परदेशाशी संबंधित प्रयत्नांना सकारात्मक दिशा मिळू शकते. करिअरमध्ये नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीतही परिस्थिती सुधारण्याची शक्यता असून, पूर्वी केलेल्या प्रयत्नांचा फायदा मिळू शकतो. आत्मविश्वास वाढण्यासोबतच सामाजिक वर्तुळात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

तूळ

या काळात एकापेक्षा अधिक ग्रहांची स्थिती या राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, कामाच्या संधी किंवा भागीदारीचे प्रस्ताव मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी जबाबदारी वाढण्यासोबत प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढण्याचे मार्ग सापडू शकतात. कला, मीडिया, लेखन, डिझाईन किंवा सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींच्या कौशल्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

आर्थिक आघाडीवर काही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असून, जुन्या आर्थिक व्यवहारातून फायदा होऊ शकतो. व्यवसायात नफा वाढण्याची संधी निर्माण होऊ शकते. गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णयांमध्येही अनुकूल घडामोडी होण्याची शक्यता ज्योतिषीय गणितातून व्यक्त केली जाते. कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते आणि त्यातून मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)