October Grah Gochar 2026: ऑक्टोबर २०२६ हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा महिना ठरणार आहे. या काळात गुरु, शुक्र, बुध आणि सूर्य या चार मोठ्या ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहेत. विशेष म्हणजे ३ ऑक्टोबरला शुक्र वक्री होतील, १७ ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करतील, २४ ऑक्टोबरला बुध वक्री होतील, तर ३१ ऑक्टोबरला गुरु कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करतील. या ग्रहस्थितींमुळे काही राशींसाठी करिअर, पैसा आणि प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात.
ऑक्टोबरमध्ये तयार होणार ‘४’ राजयोग
१७ ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करतील. तेथे आधीपासून असलेल्या बुधासोबत सूर्याची युती होऊन बुधादित्य राजयोग तयार होईल. त्यानंतर २० ऑक्टोबरला धन-वैभवाचा कारक शुक्र स्वतःच्या तूळ राशीत प्रवेश करेल.
शुक्र आणि बुधाच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल. त्याच वेळी सूर्य, बुध आणि शुक्र एकाच राशीत आल्याने त्रिग्रही योग तयार होईल. शुक्र स्वतःच्या राशीत असल्यामुळे मालव्य राजयोगाचाही प्रभाव राहणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत.
कोणत्या राशींना होऊ शकतो फायदा?
मेष राशी: ऑक्टोबरमध्ये करिअरच्या दृष्टीने सकारात्मक बदल होऊ शकतात. नवीन जबाबदारी किंवा कामाची संधी मिळू शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी योग्य नियोजन केल्यास फायदा होऊ शकतो. आत्मविश्वास वाढल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास मदत मिळेल.
कर्क राशी: या राशीच्या व्यक्तींसाठी नशीब अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये प्रगती, प्रमोशन किंवा बदलीची शक्यता निर्माण होऊ शकते. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतात.
सिंह राशी: महिन्याच्या अखेरीस गुरु सिंह राशीत प्रवेश करणार असल्यामुळे या राशीसाठी महत्त्वाचा टप्पा सुरू होऊ शकतो. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षण घेण्याच्या संधी मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता असून संततीकडून आनंद मिळू शकतो.
तूळ राशी: ऑक्टोबर महिना तूळ राशीसाठी विशेष ठरू शकतो. या राशीत सूर्य, बुध आणि शुक्राचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात आणि नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशी: महिन्याच्या शेवटी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. मालमत्ता किंवा प्रॉपर्टीशी संबंधित गुंतवणुकीतून फायदा होण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते.
‘या’ राशींनी आर्थिक व्यवहारात सावध राहावे
मिथुन, कन्या आणि मीन राशीच्या व्यक्तींनी ऑक्टोबरमध्ये पैशांच्या व्यवहारात विशेष काळजी घ्यावी. कोणालाही मोठी रक्कम देण्यापूर्वी किंवा नवीन आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करणे आवश्यक ठरू शकते. या काळात जबाबदाऱ्याही वाढण्याची शक्यता आहे.
तर वृषभ, धनु, मकर आणि कुंभ राशींसाठी ऑक्टोबरचा काळ तुलनेने सरासरी राहण्याचे संकेत आहेत. मोठे निर्णय घेताना घाई न करता परिस्थितीचा विचार करणे फायदेशीर ठरू शकते.
