October Grah Gochar 2026 : ऑक्टोबर महिना सुरू झाला असला तरी या महिन्याचे अजून २७ दिवस बाकी आहेत. या उर्वरित दिवसांत तीन मोठे ग्रह आपली चाल बदलणार आहेत. १७ ऑक्टोबरला सूर्य राशी परिवर्तन करेल. त्यानंतर २४ ऑक्टोबरला बुध वक्री होईल आणि ३१ ऑक्टोबरला गुरू राशी बदलेल. ज्योतिषाच्या दृष्टीने ऑक्टोबरचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण या ग्रहांच्या स्थितीचा थेट परिणाम नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवनावर दिसून येऊ शकतो.

याआधी ३ ऑक्टोबरला शुक्र वक्री झाला आहे. आता उर्वरित दिवसांत सूर्य, बुध आणि गुरूची स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या बदलांचा प्रभाव सर्व राशींवर एकसारखा असणार नाही. काही राशींसाठी करिअरमध्ये पुढे जाण्याच्या चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात, तर काहींना पैशांच्या बाबतीत खबरदारी बाळगावी लागेल.

१७ ऑक्टोबरला सूर्य बदलणार राशी

१७ ऑक्टोबरला सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मविश्वास, नोकरी, पद आणि प्रशासनाचा कारक मानले जाते. सूर्याच्या या राशी बदलाचा परिणाम करिअर आणि कार्य क्षेत्रावर स्पष्टपणे दिसून येईल. या काळात मेष, मिथुन, सिंह आणि धनु राशीच्या लोकांना कामात चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरीत नवीन जबाबदारी मिळणे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठीही नवे संपर्क फायदेशीर ठरू शकतात.

२४ ऑक्टोबरला बुध होणार वक्री

२४ ऑक्टोबरला बुध वक्री होणार आहे. बुधाला व्यापार, संवाद, बुद्धी आणि वाणीचा कारक मानले जाते. बुधाची चाल बदलल्याने या क्षेत्रांशी संबंधित कामांमध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकतात. मिथुन, कन्या, तूळ आणि मकर राशीच्या लोकांना या काळात आपल्या कामात आणि पैशांशी संबंधित निर्णयांमध्ये काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते नीट वाचून घ्या. व्यवसायात नवीन डील करताना घाईगडबड करू नका. मात्र, वृषभ आणि मीन राशीच्या लोकांना जुनी अडकलेली कामे पूर्ण करण्याची आणि रखडलेले व्यवहार पुढे नेण्याची संधी मिळू शकते.

३१ ऑक्टोबरला गुरूचे मोठे गोचर

या महिन्यातील सर्वात मोठा ग्रह बदल ३१ ऑक्टोबरला होणार आहे. या दिवशी गुरू कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करेल. गुरूला ज्ञान, शिक्षण, विवाह, संतती, संपत्ती आणि प्रगतीचा कारक मानले जाते. गुरूने सिंह राशीत प्रवेश केल्यामुळे मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नोकरी करणाऱ्यांना नवी जबाबदारी किंवा उत्तम संधी मिळू शकते. व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.

मेष राशीच्या लोकांसाठी काम आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. गुरूचा सिंह राशीत प्रवेश झाल्याने या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि नव्या संधी समोर येतील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये चांगला लाभ मिळण्याची स्थिती बनेल.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)