Shukra Vakri: शुक्राला ज्योतिषशास्त्रात सौंदर्य, प्रेम, रोमांस, विवाह, भौतिक सुख आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे कुंडलीतील शुक्राची स्थिती व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम करते, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. शुक्राची स्थिती चांगली असल्यास प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, सुख-सुविधा आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम मिळू शकतात, तर शुक्राची स्थिती बदलल्यास त्याचा परिणाम या गोष्टींवरही होऊ शकतो. त्यामुळे शुक्राच्या हालचालीकडे ज्योतिषशास्त्रात विशेष लक्ष दिले जाते.
याच शुक्र ग्रहाची ३ ऑक्टोबरपासून वक्री चाल सुरू होणार आहे. शुक्र तब्बल ४२ दिवस वक्री अवस्थेत राहणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र वक्री असताना काही महत्त्वाची कामे सुरू करणे टाळावे, असा सल्ला दिला जातो. विशेषतः प्रेम, विवाह, नवीन काम, गुंतवणूक आणि महागड्या वस्तूंच्या खरेदीशी संबंधित निर्णय घेताना या काळात सावध राहणे गरजेचे मानले जाते. त्यामुळे शुक्र वक्रीच्या काळात कोणती कामे करणे टाळावे, हे जाणून घेऊया.
साखरपुडा आणि लग्न टाळावे
शुक्राला विवाह, प्रेम आणि रोमांसचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे शुक्र वक्री असताना चुकूनही साखरपुडा, लग्न किंवा नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात करू नये. शुक्र वक्रीच्या काळात ही कामे केल्यास नातेसंबंधांमध्ये दुरावा, मतभेद किंवा खटके निर्माण होऊ शकतात.
नवीन काम सुरू करू नका
शुक्राच्या वक्री गतीदरम्यान नवीन कामाची सुरुवात करणे टाळावे. या काळात सुरू केलेल्या कामांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळण्यास अडथळे येऊ शकतात, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. त्यामुळे नवीन काम सुरू करण्याऐवजी आधीपासून सुरू असलेल्या कामांवर लक्ष देणे योग्य मानले जाते.
गुंतवणूक करताना सावध राहा
शुक्र भौतिक सुख आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह असल्याने शुक्र वक्री असताना नवीन गुंतवणूक करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. या काळात घाईघाईने घेतलेले आर्थिक निर्णय नुकसानकारक ठरू शकतात, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.
महागड्या वस्तूंची खरेदी टाळा
शुक्र वक्रीच्या काळात नवीन आणि महागड्या वस्तू खरेदी करणेही टाळावे. विशेषतः सौंदर्य वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, दागिने, महागडे कपडे किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करताना सावध राहावे. या काळात केलेल्या खरेदीबाबत नंतर पश्चात्ताप होऊ शकतो, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
